* मध्यरात्री मराठे ज्वेलर्सचे शटर उचकटले
* दोन चोरटे सी सी कॅमेऱ्यात कैद
ठाणे : ठाणे स्टेशनसमोरील मराठे ज्वेलर्स या सराफी पेढीचे शटर सोमवारी मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी उचकटून सुमारे पाच कोटींचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या धाडसी चोरीबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नौपाडा पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशनसमोरील परिसरात वामन शंकर मराठे हे ज्वेलर्स दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री दोन अज्ञात चोरांनी या ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील काही किलो सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी नौपाडा पोलीस व गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेत चोरट्यांनी नेमके किती दागिने चोरून नेले याबाबत अद्याप तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीच्या घटनेत पाच कोटी रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरट्यांनी हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. नौपाडा पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा मागोवा काढीत आहेत. लवकरच आरोपी गजाआड होतील, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले.