* क्लस्टरसाठी इमारती ठरवल्या धोकादायक
* रहिवाशांचा प्रशासनावर आरोप, कारवाईला केला विरोध
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेला ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील दौलत नगरमधील रहिवाशांचा विरोध कायम असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेने अखेर येथील एका इमारतीवर हातोडा टाकून ही इमारत तोडली आहे.
या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव असताना विकासकाने कोणत्याही प्रकारचा करारनामा रहिवाशांसोबत केलेला नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याशिवाय राहण्याची पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने इमारत तोडताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेसाठीच इमारती धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप दौलत नगरमधील रहिवाशांनी केला आहे.या कारवाईला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.
या वसाहतीमध्ये जवळपास १५ इमारती असून २०० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. यामधील काही इमारती या धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार २०२२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इमारतींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. मात्र कालांतराने विकासक आणि कमिटीने कोणालाही विचारत न घेता क्लस्टर योजनेचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप यापूर्वी इथल्या रहिवाशांनी केला आहे.
सुरुवातीला इमारतींचा पुनर्विकास यश अशोका विकासक करणार होता. मात्र, आता विकासकाच्या भागीदारीत सगे-सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याची स्थानिकांचे म्हणणे आहे. दौलत नगर भागातील १५ इमारतींचा पुनर्विकास करण्याचे आम्ही नियोजन केले. २०२२ रोजी यश अशोका या खासगी विकासकासोबत करार देखील करण्यात आला. मात्र २०२४ रोजी कमिटीने आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेतून इमारतीचा पुनर्विकास करायचे रहिवाशांना सांगिल्यानंतर रहिवाशांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
दुसरीकडे धोकादायक इमारती म्ह्णून पालिकेच्या वतीने या इमारतींमवर कारवाई केली जात असून शुक्रवारी पालिकेच्या वतीने दौलत नगर मधील पूर्णपणे रिकामी करण्यात आलेल्या इमारत क्रमांक ८ वर हातोडा चालवण्यात आला. इमारत सी १ श्रेणीत असल्याने तसेच यासंदर्भात रहिवाशांना वारंवार नोटीस देखील देण्यात आली असल्याने आज ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. कोणताही प्रकारची जीवित हानी होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे पाटोळे यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.