आ. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागात बैठक
ठाणे : ठाणे जिल्ह्यात संचमान्यतेनंतर अतिरिक्त ठरविलेल्या मुख्य लिपीक-वरिष्ठ लिपीकांना वेतन संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेतील बैठकीत आज घेण्यात आला.
कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागात झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला.
ठाणे जिल्ह्यातील मुख्य लिपीक-वरिष्ठ लिपिकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पी. एफ. स्लिप, मुख्याध्यापकांची पदोन्नती आदी मुद्द्यांबाबत आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले, भाजपा शिक्षक आघाडीचे कोकण विभाग संयोजक विकास पाटील, एन. एम. भामरे, राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष सतीश नाडगौडा यांची उपस्थिती होती.
ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आमदार निरंजन डावखरे यांना विनंती करुन न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत अतिरिक्त कर्मचाऱ्यांनी पदावनती स्वीकारण्यास मान्यता दिली. त्याबदल्यात त्यांना वेतन संरक्षण मिळणार आहे. या बैठकीत रखडलेल्या पी. एफ. स्लिप लवकर मिळण्यासाठी वेतन पथकाबरोबर समन्वय साधून विशेष शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.