टीएमटी बसेसमधून मिळणार लैंगिक शोषणाविरुद्धचा संदेश

ठाणे: बाल लैंगिक शोषणाविरुद्ध बाल सुरक्षा जनजागृती सप्ताह राबविण्यात येत असून त्याअंतर्गत “#ProtectedByPOCSO” ही मोहिम राबविण्यात येत आहे. यानिमित्त आज ठाणे परिवहन विभागाच्या बसेसमध्ये “#ProtectedByPOCSO” हा संदेश असलेले पोस्टर लावण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालय, ठाणे महानगरपालिका, अर्पण सामाजिक संस्था यांच्यावतीने बाल सुरक्षा व अधिकार सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात #ProtectedByPOCSO या मोहिमेचे संदेश लावण्यात आले. यावेळी संदेश लावण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या १० बस गाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच याव्यक्तिरिक्त सध्या ठाणे शहरात अशा ६०० बसेस धावत आहेत, ज्यांच्या आतमध्ये हे #ProtectedByPOCSO मोहिमेचे संदेश लावण्यात येत आहेत. त्याचे अनावरण यावेळी करण्यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुंबई कोकण विभागाच्या विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन विभाग उपायुक्त श्री. बेहरे, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, न्यायिक सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड आणि ठाणे जिल्ह्याचे बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी हे उपस्थित होते.

या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने #ProtectedByPOCSO या मोहिमेअंतर्गत१० बसेसमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आले. याव्यक्तिरिक्त सध्या ठाणे शहरात अशा ६०० बसेस धावत आहेत, त्यामध्ये हे #ProtectedByPOCSO मोहिमेचे संदेश लावण्यात आले आहेत. या बसेस शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर धावणार असल्याने, साहजिकपणे त्या मार्गातील सर्व थांबे आणि नेहमीच भरपूर रहदारी असलेल्या रस्त्यांवर हे संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेतील. त्यामुळे हे संदेश त्या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात घर करतील आणि त्यातून बाल लैंगिक शोषणकर्त्यांना इशारा मिळेल. यातील प्रत्येक संदेश बाल लैंगिक शोषणाविषयी जागरुक बनवण्याबरोबरच, भारतातील सर्व मुलांचे रक्षण करायला पोक्सो कायदा समर्थ आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि शोषणकर्त्यांना बाल लैंगिक शोषणाचा अपराध केल्याबद्दल कठोर शिक्षा होऊ शकते याची त्यांना जाणीव करून देतो.