गतविजेत्या मुंबईने बंगालचा पराभव करत वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफी राखली

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने बंगालचा १० गडी राखून पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. या विजयासह, मुंबई हा दुसरा संघ (रेल्वे नंतर) सलग जेतेपद पटकावणारा ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगालचा संघ २० षटकांत ८५ धावांत स्वस्तात बाद झाला. भारताची चमकदार यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष हिने बंगालची सलामीवीर म्हणून भूमिका बजावली. परंतु केवळ चार धावा करून घोषची विकेट मुंबईच्या वेगवान गोलंदाज सायली सातघरे हिने घेतली. डावाच्या तिसऱ्या षटकात घोषने सातघरेला चौकार ठोकले, पण त्याच षटकात सातघरेने घोषला बाद करून बंगालला मोठा झटका दिला. चौकार खाल्यानंतर सातघरेने बाउन्सर टाकला आणि क्रीससोडून पुढे आलेल्या घोषला साधारण फटका मारण्यास प्रवृत्त केले. घोषला आणखी एक चौकार मारण्याची इच्छा होती परंतु चेंडू हवेत उडाला आणि मिड ऑनवर असलेल्या सायमा ठाकोरने तो पकडला.

बंगालची दुसरी सलामीवीर धारा गुजर (२६), अंडर १९ टी-२० विश्वचषक जिंकणारी रिषिता बासू (१८) आणि भारताची वेगवान गोलंदाज तीतास साधू (१७) व्यतिरिक्त बंगालच्या एकाही फलंदाजाला दुहेरी अंकात धावा करता आल्या नाहीत.

सायली आणि सायमा (ठाकोर) या वेगवान गोलंदाजांनी धावसंख्येवर अंकुश लावल्यानंतर, फिरकी गोलंदाजांनी प्रभावित केले. ऑफस्पिनर जाग्रवी पवारने चार षटकांत केवळ १३ धावा खर्च करून तीन विकेट्स पटकावल्या. या कामगिरीनंतर ती या स्पर्धेतील संयुक्त-सर्वाधिक बळी घेणारी खेळाडू (हिमाचल प्रदेशची यमुना राणासोबत) बनली. ११ सामन्यांत १६ विकेट्स घेऊन तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच डाव्या हाताची फिरकीपटू सौम्या सिंगने चार षटकात ११ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या.

मुंबईच्या गोलंदाजांनी बंगालच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. गोलंदाजांना चांगली साथ मिळाली क्षेत्ररक्षकांची ज्यांनी मैदानावर प्रत्येक धाव अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि शानदार झेलसुद्धा टिपले. बंगालच्या तीन फलंदाजांना मुंबईने धावबाददेखील केले.

प्रत्युत्तरात, विजयासाठी ८६ धावांचा पाठलाग करताना (मुंबईने गेल्या वर्षीच्या वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तराखंडविरुद्ध ८५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता), कर्णधार हुमैरा काझी (नाबाद ४१) आणि वृषाली भगत (नाबाद ४५) या मुंबईच्या सलामीच्या जोडीने दमदार कामगिरी केली. या दोघांनी मिळून १२.३ षटकांत लक्ष्य गाठले. त्यांनी त्यांच्या भागीदारीत एकूण ११ चौकार आणि एक षटकार झळकावले. काझी आणि भगत यांनी सावधगिरी आणि आक्रमकता यांचे अचूक समतोल साधले. काझी-भगत नावाच्या या वादळाला सायका इशाक आणि तिचा बंगाल संघ रोखू शकले नाहीत.

मुंबईने केलेल्या प्रत्येक धावेला खेळाडूंच्या मित्र मैत्रिनींनी आणि कुटुंबीयांनी तसेच नवोदित क्रिकेटपटू आणि माजी भारत आणि मुंबईचे खेळाडू यांनी शाबासकीची थाप दिली.

मुंबईसाठी गेले दोन वर्ष जणूकाही स्वप्नासारखे होते. प्रशिक्षक सुनेत्रा परांजपे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुंबईच्या महिलांनी वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे.