विधानसभा निवडणुकीत महायुतीचा काळ कठीण
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील ऐरोली, बेलापूर आणि मीरा-भाईंदर या तीन मतदार संघांत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याने या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई येथिल ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाने अनुक्रमे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे तर मीरा-भाईंदर येथून नरेंद्र मेहता निवडणूक लढवत आहेत. ऐरोली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे एम. के. मढवी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचा सामना महायुतीच्या उमेदवाराबरोबर होणार आहे. शिंदे गटाचे श्री. चौगुले यांना झोपडपट्टी भागातील मतदारांचा पाठिंबा आहे तर भूमिपुत्र आणि मध्यमवर्गीय मतदार भाजपाच्या पाठीशी आहेत. एम. के. मढवी यांचे देखील या मतदार संघात वजन आहे. शिवसेनेचे निष्ठावंत त्यांच्या पाठीशी उभे राहणार असून त्यांची ती ताकद आहे.
मागिल निवडणुकीत या मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीचे श्री. नाईक यांनी एक लाख १४,६४५ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना ३६,१५४ मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे मढवीसोबत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे चौगुले हे युतीच्या मतांना खिंडार पाडण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महायुतीचे गणेश नाईक यांना बसण्याची दाट शक्यता आहे.
बेलापूर मतदार संघातील उमेदवारी महायुतीच्या शिंदे गटाला मिळाली नाही, त्यामुळे विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदिप नाईक यांच्याशी होणार आहे. त्यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून उमेदवारी मिळवली आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना मागिल निवडणुकीत ८७,८५८ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना ४४,२५१ मते मिळाली होती. मनसेचे उमेदवार गजानन काळे यांना २७,६१६ मते मिळाली होती. यावेळी या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. मत विभाजनाचा सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदिप नाईक यांना होण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदर मतदारसंघात महायुतीने पुन्हा एकदा नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे तर माजी आमदार गीता जैन यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मागिल निवडणुकीत त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदार संघातून महाविकास आघाडीने काँग्रेसचे मुज्जफर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत होण्याची अपेक्षा आहे. मागिल निवडणुकीत गीता जैन यांना ७९,५७५ मते मिळाली होती. भाजपाचे नरेंद्र मेहता यांना ६४,०४९ मते मिळाली होती तर काँग्रेसचे मुजफ्फर हुसेन यांना ५५,९३९ मते मिळाली होती. या निवडणुकीत मागिल निवडणुकीची पुनरावृत्ती होते कि महाविकास आघाडी बाजी मारते हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात देखील चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस या मतदार संघावर दावा करत होती, परंतु जागा वाटपामध्ये ही जागा उद्धव ठाकरे गटाचे केदार दिघे यांना सोडण्यात आल्याने काँग्रेसचे प्रदेश चिटणीस, माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात एकतर्फी निवडणूक होणार आहे. मनोज शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मत्ताधिक्यात वाढच होणार असून ते पाचव्यांदा विजयी होण्याचे चित्र अधिक गडद होऊ लागले आहे.