शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवकांना फर्मान
ठाणे: विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आदेश देतानाच विधानसभेच्या कामगिरीवरूनच आगामी पालिकेच्या निवडणुकीत तिकीट दिले जाणार असल्याचे फर्मान शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. त्यामुळे तिकीट गमावण्याच्या भीतीने सर्वच माजी नगरसेवक चांगलेच कामाला लागले असून आपल्या प्रभागातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळेल यासाठी सर्वच माजी नगरसेवक कसोशीने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेत फूट पडल्यानंतर या ठिकाणी उबाठा आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात वर्चस्वासाठी कमालीचा संघर्ष निर्माण झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे, ओवळा-माजिवडा, कोपरी -पाचपाखाडी आणि कळवा मुंब्रा हे चार विधानसभा क्षेत्र येतात. या चारही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये कोपरी पाचपाखाडीमधून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे विधानसभा क्षेत्रातून संजय केळकर ओवळा-माजिवडामधून प्रताप सरनाईक, तर कळवा-मुंब्रा मतदार संघातून नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर बहुतांश माजी नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेले आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांचे मोठे पाठबळ शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात १३० माजी नगरसेवकांची संख्या असून यामध्ये सर्वाधिक संख्या ही शिवसेनेच्या (शिंदे गट ) नगरसेवकांची आहे. माजी नगरसेवकांचा संपर्क प्रभागात चांगला असल्याने या सर्वांवर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची आणि मोठ्या मताधिक्याने उमेदवारांना निवडून आणून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र हे आदेश देतानाच नक्की माजी नगरसेवक काम करणार का नाही हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रभागात महायुतीच्या उमेदवाराला किती मताधिक्य दिले यावर त्याला पालिकेच्या निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ पातळीवर सांगण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट गमवायला लागू नये तसेच नगरसेवक होण्याच्या आशेवर असलेले सर्वच माजी नगरसेवक आणि इच्छुक चांगलेच कामाला लागले आहेत.