डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची भाजपवर टीका
ठाणे: छगन भुजबळ हे ओबीसी असल्यानेच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांचा हा दावा शंभर टक्के खरा आहे. ही बाब भुजबळांनीच सांगितलेली असल्याने भाजपचा जातवर्चस्ववादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक आहे, “2024 – इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया ‘! या पुस्तकातील मजकुरानुसार, छगन भुजबळ हे सरदेसाई यांच्याशी चर्चा करताना म्हणाले की, वयाच्या ७५ व्या वर्षी आपण ईडीची कारवाई सहन करू शकत नव्हतो. म्हणून भाजपसोबत गेलो. आता सुखात आहे.” भुजबळ हे आक्रमक नेते असल्याने ते सत्य बोलत आहेत. ईडी, सीबीआय, आयकर यांच्यामार्फत धमकावून पक्ष फोडले जात असल्याचे शरद पवार यांनीही सांगितले होतेच. उद्धव ठाकरे यांनाही अनेकांनी हेच सांगून पक्ष सोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत धमकावल्यानंतर तीन दिवसात पक्ष फुटला होता. हे सर्वजण जाणून आहेत. आता पक्ष फोडून जे मंत्री झाले आहेत. ते सर्वजण ईडीच्या जाळ्यात होते. हे सर्वजण मोठे कलाकार आहेत, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
छगन भुजबळ हे ओबीसी असल्यानेच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली. ते तथाकथीत उच्चवर्णीय असते तर ही कारवाई झाली नसती, असे भुजबळ स्वतःच सांगत आहेत. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपच्या जात वर्चस्वाच्या लढाईत भुजबळांचा बळी गेला आहे. आपल्या देशात 85 टक्के बहुजन आहेत. या बहुजनांवर भाजपचा राग आहे. त्यांना दलित, आदिवासी, ओबीसी नको असतात. भुजबळांच्या अटकेमुळेच भाजपचा मूळ स्वभाव बाहेर आला. भाजपची जातीयवादी मानसिकता स्पष्ट झाली आहे. भाजपचा आधी दलितांवर रोष होताच आता ओबीसींवरही रोष आहे. आजही भीमा कोरेगावप्रकरणातील तरूणांना आजही वारंवार कोर्टात जावे लागत आहे. सत्ता प्राप्त करण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. पंतप्रधान मोदी हेदेखील मंगळसूत्र चोर, जास्त मुलांना जन्म देणे, असे विषय काढून द्वेषाचे राजकारण करतात. मात्र, राम मंदिरातील भ्रष्टाचारावर काहीही बोलत नाहीत. एवढेच काय डमी उमेदवारही उभा करीत नाहीत.