विकासद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही, जनताद्रोही नेत्यांना धडा शिकवा

प्रदेश भाजपचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

ठाणे: महाराष्ट्रद्रोही, विकासद्रोही, शेतकरीविरोधी, महिला व युवकविरोधी मविआविरोधात प्रदेश भाजपातर्फे दररोज आरोपपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

महाराष्ट्राच्या जनतेने २०१९ साली दिलेला कौल धुडकावून काँग्रेस व शरद पवारांच्या पक्षाच्या कुबड्या घेतलेल्या नकली शिवसेनेने महाराष्ट्राची वाट लावली. भ्रष्टाचार, विकासाला विरोध, समस्याग्रस्त शेतकऱ्यांची उपेक्षा, दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष, आणि केवळ कुटुंब व पक्षपरिवाराचे भले करण्यासाठी राज्याला वेठीस धरणाऱ्या मविआ सरकारमुळे महाराष्ट्राची सातत्याने पिछेहाट झाली. येत्या काळात मविआच्या नाकर्त्या कारभाराचा पंचनामा करण्यात येणार असून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान करणाऱ्या या स्वार्थी आघाडीस सत्तेपासून दूर ठेवण्याच्या जनतेच्या निर्धारास बळ देण्याकरिता भाजपने आरोपपत्रांची मालिका सुरू केली आहे, असे श्री.भातखळकर यांनी सांगितले.

स्वतःचे कोणतेच कर्तृत्व नसणारे, निवडणूकदेखील लढवू न शकणारे, ऐतखाऊ, पित्याच्या पुण्याईवर जगणारे उद्धव ठाकरे आपण आग्रह केल्यामुळे मुख्यमंत्री झाले, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला होता. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही, बाळासाहेबांचा पुत्र नसतो, तर मला काडीचीही किंमत नाही असे सांगून तशी कबुलीच दिली होती. मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेल्या ठाकरे यांनी शिवसैनिकास मुख्यमंत्री करण्याऐवजी स्वतःच पदावर डल्ला मारला, आणि आपल्या कृतीचे समर्थन करण्याकरिता शाब्दिक कसरती सुरू केल्या. महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आघाडीचा सत्ताकाळ अडीच वर्षातच आटोपला, अन्यथा महाराष्ट्र लयास गेला असता असे सांगून श्री. भातखळकर यांनी मविआच्या सत्ताकालातील महाराष्ट्रद्रोही कामांचा पाढाच पहिल्या पत्रकार परिषदेत वाचला.