माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता!

राज ठाकरे यांचे प्रतिपादन

डोंबिवली : मागील विधानसभा निवडणुकीत ज्यांना मतदान केले ते आता युतीत आहेत की आघाडीत याचा कोणालाच पत्ता नाही. गेल्या पाच वर्षातील गोष्टींची मनातल्या मनात उजळणी केली पाहिजे. आमचा राजू एकटा होता. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. माझी पहिलीच निवडणूक प्रचारसभा निवडून येणाऱ्या जागेवर ठेवली आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी डोंबिवलीत केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली सभा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सोमवारी संध्याकाळी श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी अँड टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडली. यावेळी मनसेचे कल्याण ग्रामीण उमेदवार प्रमोद (राजू) पाटील, कल्याण पश्चिम मनसे उमेदवार उल्हास भोईर आणि बदलापूरच्या उमेदवार संगीता चेंदवणकर यांच्यासह कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, शहर अध्यक्षा मंदा पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, प्रल्हाद म्हात्रे, सुदेश चुडनाईक, हर्षद पाटील, मिलिंद म्हात्रे, राहुल कामत, मंदा पाटील, संजय दुबे, योगेश पाटील, विनोद पाटील, मंगेश भालेराव दीपिका पेडणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी आमदार रमेश पाटील यांनी सभेच्या प्रचाराचा नारळ वाढविला. यावेळी एक नारा जोरसे मनसे मनसे, एक नारा दिलसे मनसे मनसे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. प्रारंभी महाराष्ट्र गीताने सभेची सुरुवात झाली. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघचा मोठा विस्तार आहे. तीन उमेदवार जरी असले तरी आपणच एक नंबरी राजू पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान राज ठाकरे म्हणाले, पाच वर्षात ज्या गोष्टी घडल्या त्याची मनातल्या मनात उजळणी करा. भाजपा-शिवसेनेचे 15 मिनिटांत लग्न तुटले, कारण काकांनी डोळे वाटरले. उद्धव ठाकरे ज्यांच्या विरोधात निवडणुका लढले ते त्याच्या बरोबर जाऊन बसले. उद्धव ठाकरे हे व्यासपिठावर असताना अमित शहा म्हणाले होते की आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस. मग त्यावेळी उद्धव ठाकरे का नाही बोलले. वेगळ्या विचारांशी आघाडी केली. स्वतः स्वार्थासाठी इथपर्यंत गेलात. विचार नावाची गोष्ट उरली नाही. 40 आमदार गेले. निसर्ग पाहायला गेले होते. उद्धव ठाकरे यांना पत्ता नाही. एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळी काँगेस व राष्ट्रवादी बरोबर बसणं म्हणजे श्वास घेता येईना. मात्र अजित पवार आले महायुतीत. कोणते राजकारण सुरु आहे. हे महाराष्ट्राचे भविष्य? शेतकरी आत्महत्या करतात, तरुण नोकऱ्या मागत आहेत? मात्र हे सगळेच मज्जा करतात. कारण ते जनतेला गृहीत धरत आहेत. हा त्यांचा समज जोपर्यत मोडत नाही तोपर्यत असेच होणार. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला. आता देवच वाचवेल या महाराष्ट्राला. फोडाफोडीचे आद्य हे शरद पवार. फोडाफोडीचे राजकारण करता करता आता तर पक्ष, निशाणी, नावच ताब्यात घेत आहेत.
आजपर्यंत असं पहिले नव्हतं. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची दशा चालू आहे. व्यासपिठावर भोजपुरी गाण्यावर महिला नाचत आहेत. हीच लाडकी बहीण योजना का ? अशी लाडकी बहीण योजनेवर फटकारा लगावला.

पक्षापेक्षा महाराष्ट्र मोठा, महाराष्ट्र बरबाद होता कामा नये, अटकेपार झेंडा रोवणाऱ्या महाराष्ट्रात व्यासपिठावर बाया नाचविल्या जात आहेत. महाराष्ट्राकरता जागे रहा. अनेकांचा डोळा आहे महाराष्ट्रावर. मी तळमळीने काम करत आहे. म्हणून एकदा माझ्या हातात सत्ता द्या. कोविड काळात राजू पाटील यांनी खूप काम केले. स्वतः चे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून दिले. माझी विनंती आहे की नव्या उमेदीने पुन्हा राजू उभा आहे त्याच्या पाठशी उभे रहा, असे आवाहनही श्री.ठाकरे यांनी केले.