एपीएमसी बाजारात जुना कांदा खात आहे भाव

नवी मुंबई : मागील चार दिवसांपासून वाशीतील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात नाफेडमधील कांद्याची आवक बंद आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने जुना कांदा चांगलाच भाव खात आहे.

सोमवारी बाजारात उच्च प्रतीच्या कांद्याला ५७ रुपये तर मध्यम कांद्याला ३० ते ५० रुपये भाव मिळाला. तर आगामी काळात मुबलक प्रमाणात कांद्याची आवक न झाल्यास दर आणखी वधारण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

मागील काही दिवसांपासून नवीन कांद्याचे उत्पादन कमी होत असल्याने बाजारात आवक घटत आहे. त्यामुळे मागणी प्रमाणे कांदा पुरवठा होत नसल्याने जुना कांदा अधिक भाव खात आहे. नवीन कांदा हा चवीला गोड असल्याने जेवणासाठी जुन्या कांद्याला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून बाजारात जुन्या कांद्याचे दर ४५ ते ५० रुपयांनी उपलब्ध होते. मात्र मागील चार दिवसांपासून बाजारात नाफेडचा कांदा आवक बंद आहे. त्यामुळे कांद्याचा कमरता भासत आहे. बाजारात नवीन कांदा २५ गाड्या तर जुना कांदा ५०गाडी आवक आहे. मात्र यामध्ये देखील हलका, खराब कांदा मोठ्या प्रमाणात येत असून त्यामुळे उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचे दर कडाडले आहेत.अशी माहिती कांदा बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.