बंडाचा झेंडा फडकला; ताप होणार महायुतीला

नवी मुंबई, कल्याण, भिवंडीत डोकेदुखी

ठाणे: ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील बंड शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश न आल्याने नवी मुंबई, कल्याण, भिवंडी येथिल उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. काही प्रमाणात महाविकास आघाडीला बंड रोखण्यात यश आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्या दिवशी अनेक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात राहिले. सर्वाधिक बंडखोरी महायुतीच्या उमदेवारांच्या विरोधात झाली आहे. भिवंडी तालुक्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण असे मतदार संघ येतात. भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विद्यमान आमदार असून त्यांनाच महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. येथे बंडखोरी झाली नाही, मात्र समाजवादी पक्षाने भिवंडी पश्चिममध्ये रियाज आझमी यांना उभे केले आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीने काँग्रेसने दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिली असताना काँग्रेसचे बंडखोर विलास पाटील रिंगणात आहेत. तर भिवंडी पूर्वमध्ये माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी नाही. या ठिकाणी भाजपचे संतोष शेट्टी यांना शिंदेच्या शिवसेनेने आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये विद्यमान आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे महादेव घाटाळ रिंगणात आहेत. भाजपच्या स्नेहा पाटील यांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे. माजी मंत्री कपिल पाटील यांनी या बंडखोरीला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. कपिल पाटील यांना या मतदार संघात कमी मताधिक्य मिळाल्याने शांताराम मोरे यांना आव्हान देण्यासाठी स्नेहा पाटील रिंगणात उतरल्याचे बोलले जात आहे.

कल्याण विभागात चार विधानसभा मतदार संघाचा समावेश असून डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध दीपेश म्हात्रे अशी दुरंगी लढत आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध महायुतीचे नजीब मुल्ला आणि मनसेचे सुशांत सूर्यराव यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे सुभाष भोईर, शिंदेच्या शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. कल्याण पूर्वमध्ये महायुतीच्या सुलभा गायकवाड, महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे तर शिंदे गटाचे बंडखोर महेश गायकवाड आणि काँग्रेसचे बंडखोर सचिन पोटे यांनी अर्ज दाखल केले होते. सचिन पोटे यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी शिंदेच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी बंड कायम ठेवले आहे. कल्याण पश्चिममध्ये महायुतीचे विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे सचिन बासरे तर भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार आणि वरुण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नरेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेतला असला तरी भाजपचे वरुण पाटील रिंगणात आहेत. त्यांनी बंडाचे निशाण कायम ठेवले आहे. मनसेचे उल्हास भोईरही या ठिकाणी रिंगणात आहेत.

शहापूरमध्ये पारंपरिक लढत होत असून विद्यमान आमदार दौलत दरोडा हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा हे उमेदवार आहेत. लोकसभेला या मतदार संघात निलेश सांबरे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यांनी जिजाऊ संघटनेकडून रंजना उघडा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणीही तिरंगी लढत आहे. मुरबाड हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आमदार किसन कथोरे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुभाष पवार रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत अपेक्षित असून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेला पराभूत झालेले उमेदवार कपिल पाटील यांनी कथोरे यांनी आपल्याला मदत केली मदत केली नाही असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर कपिल पाटील काय भूमिका घेतात यावर येथील चित्र अवलंबून आहे.

ओवळा माजिवडा आणि मुख्यमंत्र्यांचा कोपरी पाचपाखाडी हे महत्वाचे मतदार संघही ठाणे शहरात येतात. यातील ओवळा माजिवडा मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात महाविकास आघाडीने नरेश मणेरा यांना तर मनसेने संदीप पाचंगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे इथे तिरंगी लढत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात काँग्रेसचे जेष्ठ माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे सेनेचे राजेश वानखडे यांना रिंगणात उतरवले असून येथे काँग्रेसचे सुमेध भावर यांनी बंड केले आहे. या मतदार संघात महायुतीचे डॉ. बालाजी किणीकर रिंगणात आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ऐरोली आणि बेलापूर हे मतदार संघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येतात. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे पुन्हा एकदा महायुतीकडून ऐरोली मतदार संघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे विजय चौघुले यांनी बंडखोरी करून आव्हान दिले आहे. तर महाविकास आघाडीकडून या मतदार संघात एम. के. मढवी यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत आहे. तर बेलापूर मतदार संघात मंदा म्हात्रे या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून विजय नाहटा यांची बंडखोरी आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे यावेळची निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता आहे. मतदान २० तारखेला असून किती बंडखोर मतदानापर्यंत बंडाची तलवार म्यान करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील १८ पैकी १४ मतदार संघात तिरंगी चुरशीच्या लढती तर दोन मतदार संघात दुरंगी लढती होत आहेत. दुरंगी लढती होत असलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली अशा दोन मतदार संघाचा समावेश आहे.