फोडाफोडीचे राजकारण थांबवा; मतांचा अपमान होऊ देऊ नका!

राज ठाकरे यांचे मतदाराना आवाहन

ठाणे: पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणुक आहे. आज महाराष्ट्रात जो चिखल झाला आहे, त्यांना कायमचे घरी बसवा. फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा. तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करून दाखवीन, असे आग्रही आर्जव मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ओवळा-माजिवडा मतदार संघातून संदीप पाचंगे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघात ॲड.सुशांत सूर्यराव या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन उमेदवारांच्या  प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहिर प्रचार सभा सोमवारी रात्री ठाण्यातील ब्रम्हांड सर्कल येथे पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी, ठाणे तलावांचे शहर होते पण बर्बाद केले, बिल्डरांच्या घशात घालुन वाट लावुन टाकल्याचा आरोप केला. ठाणे एकमेव जिल्हा आहे जेथे सहा ते सात महापालिका आहेत. परप्रांतातून मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांचे पहिले ठिकाण ठाणे आहे. मुंब्रा उगाच वाढत नाही आहे. तेव्हा, सतर्क राहा असे आवाहन करून राज ठाकरे यांनी ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणुक असल्याचे सांगितले. आज महाराष्ट्रात जो चिखल झाला आहे. त्यांना कायमचे घरी बसवा. फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा. तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करून दाखवीन असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी ठाणेकरांना यावेळी दिला.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान केले. तरीही, वेगळीच आघाडी केली, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावत राज ठाकरे यांनी मविआ तसेच शिंदे गट आणि अजित पवारांवरही आसुड ओढले. विचारांशी आणि मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार मांडीला मांडी लावून बसले म्हणून तुमची घुसमट झाली आणि तुम्ही ४० आमदार फोडले. आता अजित पवार थेट तुमच्या मांडीवर येऊन बसलेत. आता तुमची घुसमट होत नाही का, असा सवाल करत राज ठाकरे यांनी दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश केला.

एकेकाळी ठाणे तलावांचे शहर ओळखले जायचे, पण आता हे तलाव बुजवून बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. त्यामुळे इमारतींमधील रहिवाशांना टँकरने पाणी प्यायची वेळ आली आहे. संपूर्ण ठाण्याची बजबजपुरी करून टाकली असून त्यांना आता पुन्हा निवडून देऊ नका, असे परखड मत राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत मांडले.