रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा ३-० अशा फरकाने पराभव करून न्यूझीलंडने इतिहास रचला आणि ही शानदार कामगिरी करणारा पहिला पाहुणा संघ बनला.
भारताने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जास्त वेळ वाया न घालवता केवळ सात मिनिटांत न्यूझीलंडची शेवटची विकेट काढली. पाहुण्यांची शेवटची फलंदाजी जोडी, एजाझ पटेल आणि विल ओ’रुर्के १४ चेंडू टिकू शकली. रवींद्र जडेजाने पटेलला (८) बाद केले. डीप मिड-विकेट वर उभा असलेल्या आकाश दीपने पटेलचा झेल टिपला. त्या विकेटसह, जडेजाने सामन्यातील त्याची १०वी विकेट (५/६५ आणि ५/५५) घेतली आणि ही किमया त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा पूर्ण केली. न्यूझीलंडचा दुसरा डाव ४५.५ षटकांत १७४ धावांवर आटोपला आणि त्यांने भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले.
शेवटच्या डावात फलंदाजी करण्यापूर्वी भारताने हलका रोलर खेळपट्टीवर फिरवून घेतला ज्याच्याने खेळपट्टी एकत्रित राहील अशी अपेक्षा होती. परंतु खेळपट्टीपेखा फलंदाज त्यावर कसे खेळतात हे महत्वाचे असणार होते. या मालिकेत निराशाजनक फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय फलंदाजांना या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उत्कृष्ट प्रदर्शन देण्यापलीकडे पर्याय नव्हता.
या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत पाच डावात ८० धावा करणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा याची विकेट काढण्यात न्यूझीलंड तिसऱ्याच षटकात यशस्वी झाले. हवेत खेळण्याच्या प्रयत्नात शर्माने (११) त्याची विकेट गमावली. ग्लेन फिलिप्सने मिड-विकेटवरून मागे धावत एक उत्कृष्ट झेल टिपला. शर्मा तंबूत परतल्यानंतर, शुभमन गिल आला, ज्याने पहिल्या डावात भारतासाठी सर्वाधिक ९० धावा केल्या होत्या. गिलकडून (१) दुसऱ्या डावात पुन्हा एकदा अनेक अपेक्षा असताना, तो पटेलच्या पुढच्याच षटकात बाद झाला. चेंडू नाही वळणार म्हणून त्याने तो सोडला आणि त्याला मोठी किंमत चुकवावी लागली. थोड्याच वेळात, पटेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीच्या (१) बॅटची बाहेरची कड लागून चेंडू थेट फर्स्ट स्लिपमध्ये असलेल्या डॅरिल मिचेलकडे गेला.
मैदानावर आता दोन डावखुरे फलंदाज, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत होते. ते बघून न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ऑफस्पिनर फिलिप्सला गोलंदाजी करण्यास आणले. फिलिप्सने त्याच्या पहिल्याच षटकात जैस्वालला (५) पायचीत बाद केले.
भारताने सात षटकांत २८ धावांवर त्यांचे पहिले चार फलंदाज गमावले. विजयासाठी आणखी ११९ धावांची गरज असताना भारत सर्व प्रकारच्या अडचणीत सापडले होते. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेला स्थानिक मुलगा सरफराज खान ज्याने पहिल्या डावात त्याचे खातेही उघडले नव्हते याच्यासमोर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंड फिरकीपटूंचे मोठे आव्हान होते. प्रभावशाली खेळी खेळण्याची सुवर्ण संधी त्याच्याकडे होती परंतु तो केवळ एक धाव करून झेलबाद झाला. फुल्ल टॉस चेंडूवर प्रहार करताना सरफराजने डीप मिड-विकेटवर उभ्या असलेल्या रचिन रवींद्रच्या हातात खेळला.
अवघ्या २९ धावांत भारताने त्यांचा निम्मा संघ गमावला. भारताला मोठ्या भागीदारीची नितांत आवश्यकता होती. तेव्हा पंत आणि जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. त्या भागीदारीने भारतीय चाहत्यांमध्ये विजयाची आशा जागवली. परंतु त्या आशांवर पटेलने पाणी सोडले. त्याने जडेजाला (६) बाद केले. लेग साइडवर चेंडू ढकलण्याचा प्रयत्न करताना, जडेजा शॉर्ट लेगवर असलेल्या विल यंगच्या हातून झेल बाद झाला. विशेष म्हणजे, त्याच जागेवर उभ्या असलेल्या यंगकडून जडेजाचा पहिल्याच चेंडूवर झेल सुटला होता.
एका बाजूने जरी विकेट्स पडत असल्या तरी पंतने न्यूझीलंडवर आक्रमण करण्यास थांबवले नाही. त्याने ४८ चेंडूत त्याचे १४वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात ६० धावा केल्यानंतर पंतने दुसऱ्या डावात आणखी एक चांगली खेळी खेळली. वॉशिंग्टन सुंदरसह (नाबाद ६), पंतने पहिल्या सत्रात भारताला २० षटकांत ९२ धावांची संख्या उभी करण्यात मदत केली. या दरम्यान भारताने सहा विकेट्स गमावल्या होत्या. सातवी विकेट पण गेली असती जर तीन धावांवर असलेल्या सुंदरचा झेल डेव्हन कॉनवेकडून सुटला नस्ता तर.
दुसऱ्या सत्राच्या एका तासापेक्षा कमी अवधीत, भारताने ९.१ षटकांत त्यांचे शेवटचे चार विकेट्स गमावले. न्यूझीलंडने पहिले ६४ धावा झळकावलेल्या पंतला बाद केले. त्यानंतर अश्विन (८) आणि सुंदर सात षटकांच्या संक्षिप्त कालावधीसाठी एकत्र आले, परंतु फिलिप्सने अश्विनची विकेट घेतली आणि मग पुढच्या तीन चेंडूत भारताच्या शेवटच्या दोन विकेट्स पडल्या. पहिल्याच चेंडूवर आकाश दीपच्या बॅट आणि पॅडमधील अंतराचा फायदा घेत फिलिप्सने त्याची दांडी गुल केली आणि मग सुंदरचा डाव (१२) पटेलने संपुष्टात आणला. मुंबईत जन्म झालेल्या या खेळाडूने तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण ११ विकेट्स (५/१०३ आणि ६/५७) घेऊन न्यूझीलंडच्या गोलंदाजीची कमान सांभाळली.
भारताचा डाव १२१ धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडने २५ धावांनी विजय नोंदवला. या मालिकेतील तिन्ही सामने जिंकून भारतावर त्यांच्याच होम ग्राऊंडवर न्यूझीलंडने मात केली आणि एक ऐतिहासिक किमया साकारली.