१४९ धावांनी पिछाडीवर असताना आणि सहा विकेट्स शिल्लक असताना, भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांची जोडी पहिल्या दिवसाच्या खेळानंतर नाबाद होती. त्या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली. दोन्ही फलंदाजांनी त्यांचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सावधगिरी आणि आक्रमकता यांच्यात अचूक संतुलन साधले. ही भागिदारी मात्र ३८व्या षटकात लेगस्पिनर इश सोधीने तोडली. मालिकेतील पहिली कसोटी खेळताना सोधीने पंतला (६०) पायचीत बाद केले. १३वे कसोटी अर्धशतक पूर्ण करून पंत परतला. ५३ धावांवर फलंदाजी करत असताना ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर मॅट हेन्रीकडून लाँग ऑफवर पंतचा झेल सुटला होता. त्यापूर्वी फिलिप्सच्याच गोलंदाजीवर बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्क चॅपमनकडून शुभमन गिलचा झेल सुटला आणि त्याला जीवनदान मिळाले. गिल तेव्हा ४५ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर गिलने आणखी २५ धावा जोडून पहिल्या सत्रात एकूण ७० धावा केल्या. त्याला रवींद्र जडेजाची (नाबाद १०) साथ मिळाली ज्याला सरफराज खानच्या पुढे पाठवण्यात आले होते. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला सत्र भारताच्या नावावर गेला. भारताने २४ षटकात ४.५ धावा प्रति षटकाच्या सरासरीने १०९ धावा केल्या.
दुसऱ्या सत्रात भारताने १६.४ षटकांत ६८ धावा जोडल्या आणि एकूण २६३ धावा करून त्यांचा डाव आटोपला. त्या कालावधीत भारताने पाच विकेट्स गमावल्या, त्यापैकी डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने तीन आणि ऑफ स्पिनर फिलिप्सने एक विकेट घेतली. त्याचबरोबर पटेलने त्याचा कसोटी क्रिकेटमधील सहावा फायफर नोंदवला. शेवटी आकाश दीप (०) धावबाद झाल्याने भारताचा डाव समाप्त झाला. १४६ चेंडूंच्या मुक्कामात चांगली फलंदाजी करणाऱ्या गिलला (९०) त्याचे सहावे कसोटी शतक पूर्ण करण्यासाठी १० धावा कमी पडल्या. भारताला न्यूझीलंडने रचलेल्या २३५ या धावसंख्येपासून पुढे नेण्यासाठी, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ३८ धावांची एक सुरेख खेळी खेळली. अखेर भारताने २८ धावांची आघाडी घेतली.
या मालिकेत पहिल्यांदाच पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडला स्थिर सुरुवातीची गरज होती. तथापि, वेगवान सनसनाटी आकाश दीपच्या मनात काही वेगळेच होते. डावाच्या पहिल्याच षटकात बंगालच्या या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला (१) परत पाठवले. त्याने लॅथमचे स्टंप्स उखडले. सत्राच्या उरलेल्या आठ षटकांमध्ये न्यूझीलंडला आणखी कोणत्याही नुकसानाला सामोरे जावे लागले नाही. नऊ षटकांत २६ धावा करून न्यूझीलंड फक्त दोन धावांनी पिछाडीवर असताना दिवसाचा दुसरा सत्र संपला. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (नाबाद १५) आणि पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग (नाबाद ८) यांनी डाव सावरला.
दिवसाच्या शेवटच्या सत्राच्या सुरुवातीलाच, सुंदर आणि अश्विन या ऑफ स्पिन जोडीने १३व्या आणि १४व्या षटकात अनुक्रमे कॉनवे (२२) आणि रचिन रवींद्र (४) यांना बाद केले. त्यानंतर यंग आणि डॅरिल मिचेल, ज्याने पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या, एकत्रित आले. या दोघांची ५० धावांची भागिदारी पूर्ण होताच मिचेलने (२१) जडेजाच्या गोलंदाजीवर एक फटका हवेत उडवला आणि अश्विनने पाठीमागे धावत एक शानदार झेल टिपला. जडेजाचा गोलंदाजीचा एन्ड बदलण्यात आला आणि त्याने त्या एन्डने गोलंदाजी केली जिथून त्याने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. लगेचच त्याच्या पुढच्या षटकात जडेजाने टॉम ब्लंडेलची दांडी गुल करून पुन्हा एकदा या कसोटीत त्याला बाद केले. जडेजाप्रमाणेच, अश्विनने देखील त्याचा गोलंदाजीचा एन्ड बदलताच विकेट पटकावली. अश्विनने टाकलेला कॅरम बॉल फिलिप्सला (२६) कळलाच नाही आणि त्याला त्याचा परिणाम भोगावा लागला. पाच षटकांनंतर जडेजाने त्याची तिसरी विकेट घेतली जेव्हा त्याने इश सोधीला (८) ड्राइव्ह करण्यास आमंत्रित केले. सोधीने हवेत खेळत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सवर उभा असलेल्या विराट कोहलीकडे झेल दिला. पुढच्याच षटकात अश्विनने जडेजाच्या तीन विकेट्सची बरोबरी केली. त्याने अखेरकर यंगच्या (५१) १०१ चेंडूंची धैर्यपूर्ण खेळी संपवली. कॅरम बॉलचा पुन्हा एकदा उपयोग करून अश्विनने कॉट अँड बोल्ड साकारले. सत्राच्या शेवटच्या षटकात जडेजाने त्याची चौथी विकेट घेत भारताला एक गोड शेवट करून दिला. फिरकी वाचण्यात अपयशी ठरलेल्या मॅट हेन्रीला (१०) मोठी किंमत चुकवावी लागली.
दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने त्यांच्या दुसऱ्या डावात नऊ विकेट्स गमावले आणि १४३ धावांची आघाडी घेतली.