नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा डाव २३५ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने ८६ धावा केल्या परंतु त्या दरम्यान चार विकेट्स गमावल्या. द्विपक्षीय मालिकेच्या दृष्टीकोनातून हा सामना जरी महत्वाचा नसला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप लक्षात घेता हा सामना निर्णायक आहे. वानखेडे स्टेडिअमवर चांगली गर्दी (सुमारे १८,०००+) जमली, जी भारतीय संघाच्या पाठीशी उभी होती.
वेगवान गोलंदाज आकाश दीपने डावाच्या चौथ्या षटकात सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला (४) पायचीत बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. तथापि, कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागिदारी केल्याने पाहुण्यांनी जोरदार पुनरागमन केले. अखेर ही भागिदारी तोडण्यात ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरचा हात होता. तामिळ नाडूच्या या फिरकीपटूने १६व्या षटकात लॅथमची (२८) दांडी गुल केली. नंतर २०व्या षटकात सुंदरने रचिन रवींद्रला (५) लॅथमला बाद केल्या प्रमाणेच आऊट केले. भारतासाठी ती मोठी विकेट होती कारण रवींद्र हा या कसोटी मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यंग आणि डॅरिल मिचेल यांनी त्या सत्रात आणखी नुकसान होऊ दिले नाही. न्यूझीलंडने पहिल्या सत्रात २७ षटकांत तीन गडी गमावून ९२ धावा केल्या.
यंग आणि मिचेल या जोडीने आणखी ६७ धावा रचल्या आणि त्यांची ८७ धावांची भक्कम भागिदारी ४५ व्या षटकात रवींद्र जडेजाने मोडली. पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने झेल टिपला आणि यंगच्या (७१) शानदार खेळीला पूर्णविराम लावला. त्याच षटकात जडेजाने टॉम ब्लंडेलची (०) दांडी गुल केली. पुढील काही वेळातच, जडेजाने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात ग्लेन फिलिप्सला (१७) गुंडाळले. एकीकडे विकेट्स पडत असताना मिचेलने त्याची चांगली कामगिरी सुरु ठेवली आणि १२वे कसोटी अर्धशतक झळकावले. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने आणखी १०० धावा जोडून एकूण १९२ची धावसंख्या नोंदवली. त्या सत्रात भारताचा एकमेव गोलंदाज जडेजा चमकला ज्याने तीन विकेट्स पटकावल्या.
दिवसाच्या शेवटच्या सत्रात जडेजाने उत्कृष्ट प्रदर्शन सुरु ठेवले. एका षटकात आणखी दोन विकेट्स घेऊन त्याने कसोटी क्रिकेटमधील त्याचे १४वे फायफर पूर्ण केले. या डाव्या हाताच्या फिरकीपटूने त्याच्या गोलंदाजीतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इश सोधी (७) आणि मॅट हेन्री (०) यांना देता आली नाही आणि ६१व्या षटकात त्यांना तंबूत परतावे लागले. त्यानंतर मिचेलवर आपल्या संघाला स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी होती. तथापि, ८२ धावा करून, मिचेल बाद झाला. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ज्या मिचेलकडून सुंदरने तीन षटकार खाल्ले अखेर त्याच सुंदरने मिचेलला बाद केले. त्याच ६६व्या षटकात मिचेलबरोबरच सुंदरने एजाज पटेल (७) याचीही विकेट घेतली. न्यूझीलंडचा डाव ६५.४ षटकांत २३५ धावांवर आटोपला.
प्रत्युत्तरात भारताने १९ षटकांत चार गडी गमावून ८६ धावा केल्या. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने २५ धावांची भागिदारी केली. परंतु वेगवान गोलंदाज हेन्रीने शर्माची (१८) विकेट काढून भारताला मोठा धक्का दिला. नंतर शुभमन गिल आणि जैस्वाल यांनी एकत्रितपणे दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागिदारी केली आणि डाव सावरला. तथापि, जैस्वालचा ५२ चेंडूंचा मुक्काम ज्यामध्ये त्याने ३० धावा केल्या, तो एजाज पटेलने संपुष्टात आणला. पुढच्याच चेंडूवर भारताचा नाईट वॉचमन मोहम्मद सिराज (०) याला पटेलने तंबूत परत पाठवले आणि दिवसाच्या खेळाच्या शेवटी भारताला सर्व प्रकारच्या अडचणीत टाकले. भारताची समस्या आणखी वाढली जेव्हा विराट कोहली (४) धावबाद झाला.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताची परिस्थिती नाजूक आहे कारण ते अजूनही १४९ धावांनी पिछाडीवर आहेत.