विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या वेळी महाआघाडीने दाखवलेल्या चमकदार कामगिरीची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता बंडखोरीमुळे कमी दिसते. तेव्हा एकत्र राहिलेल्या आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा सर्व घटक पक्षांनी मतदान केले होते. असे यंदा होणे महाआघाडीलाच काय महायुतीलाही कठीण आहे. त्यामुळे मतदार एकाच पर्यायाला निर्णायक कौल देतील असे वाटत नाही. मते विखुरली जातील आणि या निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तिगत उमेदवारांस पसंती मिळेल. महाआघाडी असो की महायुती, कागदावर राहिली आहे. प्रत्यक्षात त्या दुभंगल्या असून उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून ठेवावा लागणार आहे. २८८ जागांसाठी ११ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी अगदी एक हजार जणांनी माघार घेतली तरी सरासरी २० ते २५ उमेदवार मतदार संघात राहतात. अशावेळी अटीतटीच्या लढतींमध्ये अपक्ष आणि बंडखोर यांच्या वाट्याला जाणारी मते विजयी उमेदवाराचे मनसुबे उधळू शकतात.
ठाण्यामध्ये १८ पैकी किमान १०-१२ ठिकाणी असे अटीतटीचे प्रसंग येऊ शकतात. बेलापूरमध्ये संदीप नाईक यांनी हातात तुतारी घेऊन धक्का दिला होताच. भाजपाच्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांना शिवसेना शिंदे गटाचे विजय नहाटा यांच्याशीही मुकाबला करावा लागणार आहे. महायुतीमधील बंडखोरी नाईकांच्या पथ्थ्यावर पडू शकते. ऐरोलीत भाजपाचे गणेश नाईक उभे असताना शिंदे गटाच्या विजय चौगुले यांनी रिंगणात उडी मारल्याने युती धर्माला गालबोट लागणार आहे. बहुचर्चित कल्याण पूर्व मतदारसंघात शिंदे सेनेला भाजपाचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याबाबत आक्षेप होताच. या ठिकाणचे उभयतांमधील वैमनस्य पोलीस स्थानकातील गोळीबार प्रकरणामुळे टोकाचे झाले होते. त्यामुळे येथे बंडखोरी होणार हे गृहीत धरण्यात आले होते. उभय पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात उभी फूट पडणार असून त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अर्थात ही जोखीम झेलायला दोन्ही पक्ष तयार दिसतात. कल्याण पश्चिममध्ये भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपाचे शहर अध्यक्ष यांच्या उमेदवारीवरून शिंदे यांचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर अडचणीत येऊ शकतात. गेल्या निवडणुकीत भोईर यांच्यासमोर पवार यांना ४३ हजार मते मिळाली होती. दोघांमध्ये २२ हजारांचा फरक होता. मनसेने ३८ हजार मते घेतली होती. त्यामुळे येथे होणाऱ्या बंडखोरीचा महाआघाडीला फायदा होऊ शकतो. भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपाच्या माजी सरपंच शिंदे यांच्या उमेदवाराला शह देऊ शकतील. मीरा-भाईंदरमध्ये भाजपातील अंतर्गत कलह त्यांना त्रासदायक ठरू शकतो. कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकतर्फी जिंकतील याचा अंदाज आल्याने मनसेने उमेदवार दिला नाही. तिथे काँग्रेसचे मनोज शिंदे उभे राहणार आहेत.
राज्याचे एकूण चित्र पाहता इच्छुक उमेदवारांच्या राजकीय आकांक्षा वाढलेल्या दिसतात. त्यांना युती वा आघाडी धर्मापेक्षा त्यांचे राजकीय भवितव्य महत्वाचे वाटते. ही डोकेदुखी हरियाणाच्या विजयामुळे पल्लवित झालेली आशा तसेच लोकसभा निवडणुकीने दिलेला आत्मविश्वास यावर पाणी फेरू शकते.