ठाण्यात महाविकास आघाडीतील वाद मिटला

एकमताने प्रचार करण्याचा आघाडीचा निर्णय

ठाणे: उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात वरिष्ठ पातळीवर यश आल्याने अखेर ठाण्यात महाविकास आघाडीत निर्माण झालेला वाद मिटला आहे.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक झाल्यानंतर एकमताने आता प्रचाराला सुरुवात झाली असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे आणि काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी तर थेट महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कोकण विभागातील जिल्हा अध्यक्षांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक भवनमध्ये झाली. यावेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, कर्नाटकचे गृहमंत्री गंगाधरैया परमेश्वरा आणि कोकणचे प्रभारी बी. एम. संदीप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोकण विभागातील पक्षातील विधानसभेला इच्छुक परंतु उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांसह स्थानिक पक्षनेते आणि कार्यकर्ते, महिला आघाडी व इतर विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत तिकीट वाटपाबाबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी चर्चा करण्यात आली. आपापल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्षांशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोनवर संवाद साधत जे काही मतभेद असतील ते विसरून निवडणुकीच्या कामात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या सर्व घडामोडीनंतर ठाण्यातही महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीत एकमताने प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

लोकांना बेरोजगार करणारे, दिल्लीला मुजरा करणारे आणि महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेणारे सरकार घालवा असे आवाहन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केले. तर सर्व जण एक दिलाने काम करतील, असा विश्वास देखील माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे,ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसची बंडखोरी कायम

कोपरी-पाचपाखाडीमध्ये काँग्रेसचे मनोज शिंदे यांची बंडखोरी कायम आहे. त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने मनोज शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझ्याशी अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही. मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.