ठाणे: दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे वर्ग २ ते ४ मधील सर्व कर्मचारी यांचे सानुग्रह अनुदान, ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच, आशा सेविकांना देण्यात येणारी ६००० रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध व्यवस्था केल्याने सानुग्रह अनुदान, वेतन आणि दिवाळी भेट ही दिवाळीच्या आधीच जमा करण्यात आली. त्याबद्दल आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत.
ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच सहा हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट तसेच, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे.
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवण्यात येते. या कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण तसेच ऑक्टोबरचे वेतन संबंधित कंत्राटदारामार्फत दिवाळीपूर्वीच करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यात आल्याची खात्री विभागप्रमुखांमार्फत करण्यात आली आहे.