ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले सायबर पोलिस ठाण्याचे उद्घाटन अखेर आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आले आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी किंबहूना या गुन्ह्यांचा थंडावलेला तपासाला वेग देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे. पोलिस आयुक्त मुख्यालयाच्या परिसरातच नवीन सायबर पोलिस ठाणे बांधण्यात आले आहे. पण गेल्या तीन महिन्यांपासून या पोलिस ठाण्याचे उद्घाटन लांबले होते. १५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलिस ठाण्याचे उद्घाटन होणार होते. पण हा मुहूर्त हुकला. त्यात आचारसंहिता लागली आहे.
सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी अखेर हे पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ते कार्यन्वित केले आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत विविधवत पूजा करून या पोलिस ठाण्याचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. त्यामुळे वाढत्या ऑनलाईन गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी बळ मिळणार असून फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपासालाही वेग मिळणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये गेल्या सात महिन्यांत ऑनलाईन फसवणुकीच्या ४५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या फिर्यादीच्या हाती काहीच येत नसल्याने शेकडो गुन्हयांची नोंदही होत नाही. वास्तविक वाढत्या आर्थिक फसवणूक किंवा ऑनलाईन फसवणुकीचा निपटारा करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे सायबर विभाग असला तरी ते तोकडे भासत आहे. स्वतंत्र पोलिस ठाणे नसल्यामुळे गेली अनेक वर्षे पोलिस आयुक्त मुख्यालयात अडगळीत हा विभाग सुरू होता. पण आता स्वतंत्र पोलिस ठाणे मिळाल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
तक्रारदारांचे हेलपाटे वाचणार
फसवणूक झालेली व्यक्ती आधी आपल्या परिसरातील पोलिस ठाणे गाठते, तेथून त्यांना सायबर विभागात पाठवले जाते. पण येथेही निराश होऊन त्यांना पुन्हा परतावे लागते. हा फेरा वर्षानुवर्षे सुरूच असल्याने ठाणे पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्वी पोलिस गाड्यांची दुरूस्ती होत असलेल्या पडीक जमिनीची निवड करण्यात आली. तेथे सुसज्ज असे पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. आता पोलिस आयुक्तालय क्षेत्रात घडणार्या सायबर गुन्ह्यांचा तपास एकाच ठिकाणी होणार असल्याने तक्रारदारांचे हेलपाटे वाचणार आहेत.