कोण जिंकणार अंतिम सामना? भारत की न्यूझीलंड?

पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर, न्यूझीलंडने रविवारी, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ७६ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी त्याच मैदानावर खेळवला जाईल.

 

आमनेसामने

भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरुद्ध ५६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने २१ जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने ३४ जिंकले आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या २२ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ११ आणि न्यूझीलंडने १० जिंकले आहेत.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), सायली सातघरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील

न्यूझीलंड: सोफी डीव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गेज (यष्टीरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, पॉली इंग्लिस (यष्टीरक्षक), फ्रॅन जोनास, जेस कर, अमिलिया कर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅना रो, लीआ तहुहू

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

राधा यादव: भारताच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट्स घेतल्या. या मालिकेत तिने आतापर्यंत एकूण सात विकेट्स पटकावल्या आहेत. तिच्या गोलंदाजीव्यतिरिक्त, तिने मागील सामन्यात ६४ चेंडूत ४८ धावांची खेळी खेळून बॅटने उपयुक्त योगदान केले.

हरमनप्रीत कौर: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधाराने चांगली सुरुवात केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने ३५ चेंडूत २४ धावा केल्या. तिच्याकडून संघाची मधली फळी सांभाळण्याची अपेक्षा आहे.

सोफी डीव्हाईन: न्यूझीलंडच्या कर्णधाराने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बॅटने आणि चेंडूने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने ८६ चेंडूत ७९ धावा झळकावल्या आणि त्यानंतर ७.१ षटकात २७ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तिच्या या शानदार प्रदर्शनासाठी तिला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लीआ तहुहू: धावसंख्येचा बचाव करताना न्यूझीलंडच्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पहिल्याच षटकात स्मृती मानधनाची मोठी विकेट घेतली. तिने १० षटकात ४२ धावा देत एकूण तीन विकेट्स घेतल्या. तिने एक निर्धाव षटक देखील फेकले.

 

हवामान

दुपारी ३७ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार असेल. सायंकाळी तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरेल. आर्द्रता ३५% ते ४४% च्या श्रेणीत असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ऑक्टोबर २९, २०२४

वेळ: दुपारी १:३० वाजता

स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

प्रसारण: स्पोर्ट्स १८ नेटवर्क,जिओ सिनेमा ऍप