ठाण्यात भाजपसमोर तिहेरी आव्हान

ठाणे: भाजपने ठाणे विधानसभेसाठी विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी दिल्याने विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पण यावेळी त्यांना ठाकरे गटाबरोबरच मनसे आणि शिवसेनेतील असहकाराचा सामना करावा लागण्याची चर्चा आहे.

महायुतीने ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव असे तगडे उमेदवार यावेळी आहेत. दरम्यान ही जागा भाजपकडे गेल्यामुळे शिवसेना शिंदे गट कमालीचा नाराज झाला असून एकतर बंडखोरी किंवा असहकाराच्या भूमिकेत आहेत. त्याचा प्रत्यय भाजपाच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाला आला असून शिवसेनेचे एखाद दोन पदाधिकारी वगळता अन्य नेत्यांनी पाठ फिरवली होती. भाजपला या तीन आघाड्यांवर सामना करावा लागणार असला तरी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार गट यांचेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली असल्याने संजय केळकर यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी झालेल्या निवडणुकांचा आढावा घेतल्यास २०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक आणि संजय केळकर यांच्यात पहिली लढत झाली. १२ हजार मतांच्या फरकाने केळकर यांनी विजयाचे कमळ फुलवले. तर २०१९ च्या निवडणुकीत आमदार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत केळकर यांनी अविनाश जाधव यांचा १९,२२४ मतांनी पराभव केला होता. या मतांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतांची शिदोरी होती तर मनसेच्या मतांमध्ये शिवसेनेच्या मतांची हजारोंच्या संख्येने बेरीज झाली. म्हणूनच श्री.जाधव यांना ७० हजारांपेक्षा जास्त मतांचा पल्ला पार करता आला. यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे.

भाजप आमदार संजय केळकर यांच्याविषयी जनमानसात चांगली प्रतिमा आहे. विविध लोकोपयोगी उपक्रम आणि विकास कामांच्या माध्यमातून श्री.केळकर यांच्या पाठीशी मोठा जनाधार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पराभवानंतरही मनसेने मतदारसंघात पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यापासून अनेक आंदोलने मनसेने केली आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धरसोड भूमिकेमुळे मतदार दुरावत चालला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची साथ यावेळी त्यांना मिळणार नाही. दुसरीकडे राजन विचारे यांच्या कमबॅकने संपूर्ण खेळच पालटला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतर विचारे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीचा ताजा अनुभव विचारे यांच्या गाठीशी आहे. लोकसभेतील त्यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाची नाराजीही त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना या मतदारसंघातून ४७ हजार ९८५ मतांची आघाडी मिळाली होती. यामध्ये भाजप मतदारांचा टक्का सर्वाधिक होता. खासदार म्हस्के यांना १ लाख २६,३२१ तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना ७८,३३६ मते मिळाली होती. आघाडीच्या मतांची बेरीज यामध्ये असली तरी ठाकरेंची मशाल तळपली होती.

* २००९ – शिवसेना ५१,०१०, मनसे ४८,५६९
* २०१४ – शिवसेना ५८,२९६, भाजप ७०८८४
* २०१९ – भाजप ९२२९८, मनसे ७२८७४