उमेदवारांचे नामनिर्देशन! ठाण्यात शक्तिप्रदर्शन!!

* जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधव, सुभाष भोईर यांनी वाजत-गाजत भरले अर्ज
* शरद पवार, राज ठाकरे यांची उपस्थिती

ठाणे: आज गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून ठाण्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नेत्यांच्या उपस्थितीत वाजत-गाजत आणि शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. माजी खासदार राजन विचारे यांनी पदाधिकाऱ्यांसह तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांनी अर्ज भरला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून सुभाष भोईर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शहरात झालेल्या राजकीय शक्ती प्रदर्शनामुळे ठाण्यात राजकीय धुळवड पहायला मिळाली.

शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांनी भरला उमेदवारी अर्ज

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठे शक्तिप्रदर्शन करत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघासाठी कौसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून जितेंद्र आव्हाड हे सलग तीन वेळा निवडून येत असून गुरुवारी त्यांनी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे शिष्य असलेले नजीब मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात गुरु विरुद्ध शिष्य असा सामना रंगणार आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांनी कौसा या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रेती बंदरपासूनच उमेवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती. रेतीबंदर चौकातूनच जितेंद्र आव्हाडांचे समर्थक जमा झाले होते. त्यानंतर पुढे मुंब्रा स्टेशनजवळ महिला आणि पुरुष अशा हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंब्रा स्टेशनच्या अलिकडून निघालेल्या रॅलीत शरद पवार स्वतः भर उन्हात रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात गेल्या १५ वर्षात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर समजला जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः या मतदार संघावर लक्ष केंद्रित केल्याने ही निवडणूक जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी अधिक सोपी समजली जात आहे. जितेंद्र आव्हाड चौथ्यांदा भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाडांनी मतदारसंघात आमूलाग्र बदल केला-शरद पवार

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदार संघात आमूलाग्र बदल केला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

गेली अनेक वर्षे या मतदारसंघामध्ये अमुलाग्र बदल घडवण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहे. आव्हाड यांची लोकांशी नाळ जोडलेली आहे. या ठिकाणी असलेली गर्दी बघून ते स्पष्ट होते. मुंब्रा वासियांना खेळण्यासाठी एक मैदान हवे आहे. त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारला विनंती केली आहे. एमसीएसाठी ग्राउंडची आवश्यकता आहे आणि त्याची मान्यता शेवटच्या टप्प्यात आहे. आमचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एमसीए मैदान या ठिकाणी लवकरच होणार आहे, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे मुंब्रा वासियांसाठी या ठिकाणी खेळण्यासाठी उत्तम असे मैदान या ठिकाणी होणार असल्याचे पवार म्हणाले.

ठाकरे गटाकडून राजन विचारे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आज शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११ वाजता चरई येथील शिवसेना शाखेतून राजन विचारे यांच्या रॅलीला सुरुवात झाली.

या रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेंभी नाका येथील स्व. आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेली गद्दारी आणि त्यानंतर ठाण्यातील शिवसैनिकांना झालेला त्रास याची खंत विचारे यांनी यावेळी व्यक्त केली. अर्ज सादर करताना राजन विचारे यांच्यासोबत लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, युवासेना कार्यकारीणी सदस्य धनश्री विचारे, सुरेश मोहिते, संजय तरे, मंदार विचारे, महेंद्र पवार, राजेंद्र महाडिक, रेखा खोपकर, महेश्वरी तरे, संगीता साळवी तसेच विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख,इतर शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजन विचारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, ठाण्याची जनता आता त्रस्त झाली आहे. पाणी असो की कचऱ्याचा प्रश्न ते सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. ठाण्यातील सुसंस्कृत मतदार योग्य धडा विरोधकांना शिकवतील, असा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांच उमेदवारी अर्ज

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला.

ढोल ताशाच्या गजरात, `जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात भव्य मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात आले. हजारो कार्यकर्त्याची उपस्थिती यावेळी होती. मी तमाम ठाणेकरांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून नक्कीच आशीर्वाद मिळतील असा विश्वास यावेळी श्री. जाधव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयातून वाजत-गाजत निघालेली मिरवणूक राम मारुती रोड, दगडी शाळेमार्गे दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या मिरवणुकीत मनसेचे नाशिक येथील नेते प्रकाश महाजन, ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, अविनाश जाधव यांच्या पत्नी सोनल जाधव आदीसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तब्बल तासभर चाललेल्या मिरवणुकीनंतर दुपारी १ वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ठाण्यात आगमन झाले. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, अभिजित पानसे उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून सुभाष भोईर यांनी भरला उमेदवारी अर्ज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण ग्रामीण मतदार संघाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गुरुवारी 24 तारखेला भोईर यांनी डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदिर येथे तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याकरता निघाले. तेथून पाथर्ली येथून घरडा सर्कल येथून क्रीडा संकुल येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे कल्याण जिल्हाअध्यक्ष डॉ.वंडार पाटील, माजी नगरसेवक वसंत भगत, वैशाली दरेकर, सुमित भोईर, अरविंद बिरमुळे, अभिजित सावंत, कल्याण पूर्व शहरप्रमुख धनंजय बोराडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.भोईर म्हणाले, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी सामील झाले होते. तिरुपती बालाजी दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरला असून मी बालाजीच्या आशीर्वादाने निवडून येईन, असा विश्वास आहे.