ठाण्यात आघाडीच्या उमेदवारांचे काम न करण्याचा काँग्रेसचा निर्णय

ठाणे: राज्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) उबाठा आणि काँग्रेसची महाविकास आघाडी असताना ठाण्यात मात्र काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. ठाण्यातील चार विधानसभा मतदार संघात काँग्रेसला एकही जागा सोडली नसल्याने ठाणे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम न करण्याचा निर्णय ठाणे काँग्रेसने घेतला आहे अशी माहिती ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.

गुरुवारी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड तर ठाणे विधानसभा मतदार संघातून राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी उपस्थित न राहता निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस महत्वाचा घटक असून ठाण्यात मात्र उमेदवारी देताना काँग्रेसला डावलले असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात केदार दिघे (उबाठा ) ठाणे विधानसभा राजन विचारे (उबाठा ),ओवळा माजिवडा नरेश मणेरा (उबाठा ) तर कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी, शरद पवार गट ) अशी उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे एकही उमेदवार न दिल्याने आम्ही केवळ नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची का ? असा प्रश्न ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष असताना काँग्रेसला एकही जागा दिली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश जाधव यांनी सांगितले.