अंबरनाथला ठाकरे गटाकडून राजेश वानखेडे यांना उमेदवारी

अंबरनाथ: विधानसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीतर्फे अंबरनाथ विधानसभेची जागा अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये राजेश वानखेडे यांना स्थान देण्यात आले आहे.

राजेश वानखेडे यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे अंबरनाथमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कडवी लढत दिली होती. मागील वेळी झालेल्या निवडणुकीत अंबरनाथमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी निवडणूक लढवली होती.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ ही एकमेव जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही जागा जिंकणे शिवसेना शिंदे गटासाठी महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात चांगली मते घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथील विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा सुमारे ३० हजार मतांनी विजय झाला. महाआघाडीतील वाटाघाटीत अंबरनाथची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आली आहे. बुधवारी ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अंबरनाथ येथून राजेश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेश वानखेडे यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती.