मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला अंबरनाथमध्ये शिवसेनेतील तिढा

अंबरनाथ: अंबरनाथमधील शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने समेट घडवण्यात आला आहे. विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी तीव्र झाला होता. त्यामुळे अंबरनाथ विधानसभेची जागा धोक्यात आल्याची चर्चा होती.

मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. किणीकर सलग चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. स्थानिक पातळीवर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वाळेकर आणि आमदार डॉ. किणीकर यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपासून हा संघर्ष आणखी तीव्र होत गेला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच अंबरनाथ शहरातील या दोन्ही गटांना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चेनंतर दोन्ही गटांमधील वाद मिटवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी स्वतःच्या फेसबुक समाज माध्यमावर एक फोटो पोस्ट करत चर्चा केल्याची माहिती दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे, यांच्यासह कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. किणीकर, शहरप्रमुख वाळेकर, अंबरनाथचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी तसेच त्यांच्या मोठ्या विजयासाठी त्यांच्या सोबत आहोत आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी निश्चित ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे अरविंद वाळेकर यांनी स्पष्ट केले.