भिवंडीत सरकारी तांदळाच्या काळाबाजाराचा प्रयत्न फसला

पोलिसांनी छापा टाकून जप्त केला १२ टन तांदूळ

भिवंडी : राष्ट्रीय अन्न महामंडळाच्या गोदामातून सरकारी रेशन दुकानात नेण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला १२ टन तांदूळ भिवंडी भदाणे गावातील एका गोदामात उतरविला. या घटनेची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी चार लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तांदळाचा काळाबाजार पोलिसांनी उधळून लावला आहे.

भिवंडीत घडलेल्या या घटनेची कामगिरी कल्याण येथील खडकपाडा पोलिसांनी बजावली. या घटनेने धान्याच्या काळाबाजारात खळबळ माजली आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा येथील राष्ट्रीय अन्न महामंडळाच्या गोदामातून १२ टन तांदूळ कल्याण येथील शासकीय रेशन दुकानात पुरवठा करण्यासाठी एमएच ०४ जीसी २७५७ क्रमांकाचा ट्रक घेऊन जात असल्याची गुप्त माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. हा तांदूळ कल्याणमधील रेशनिंग वितरण केंद्रात नेण्याऐवजी काळ्या बाजारातून विकण्यासाठी ट्रक चालकाने आपल्या ट्रकची जीपीएस यंत्रणा बदलली. त्याचप्रमाणे तो ट्रक राजनोलीमार्गे मुंबई-नाशिक मार्गावर नेला. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून भदाणे येथील जय आनंद फूड इंडस्ट्रीजच्या गोदामात पकडला. तेथे २४० पोत्यांमध्ये भरलेला १२ हजार किलो तांदूळ ट्रकमधून उतरवला जात होता. या तांदळाची बाजारभावाव किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन जय आनंद फूड इंडस्ट्रीजचे गोदाम सील केले आहे. शिधावाटप विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.