महायुतीला १६० जागा मिळणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्व्हे

मुंबई: लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधारी महायुतीची दाणादाण उडवत ४८ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या पाच महिन्यांत परिस्थिती काहीशी बदलली आहे. महायुती आणि मविआमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक सर्व्हेक्षण केले आहे.

राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५चा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान पाहता महाविकास आघाडीला विधानसभेच्या १५८ मतदारसंघांमध्ये आघाडी होती. तर महायुती १२५ जागांवर पुढे होती. पण गेल्या पाच महिन्यांत परिस्थिती बदलली असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्व्हे सांगतो. या सर्व्हेनुसार महायुतीला १६० जागा मिळू शकतात.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात जबर फटका बसला. पण आता महायुती त्या धक्क्यातून सावरली असल्याचं संघाचा सर्व्हे सांगतो. महायुती विधानसभा निवडणूक जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ‘राज्यातील परिस्थिती, जनमानसाचा कानोसा घेण्यासाठी संघ गोपनीय पद्धतीनं अंतर्गत सर्व्हेक्षण करत असतो. त्याच आधारावर भाजपची निवडणूक रणनीती ठरते. लोकसंख्या, मतदारांचा पॅटर्न पाहून उमेदवारांची निवड केली जाते,’ असं संघाशी संबंधित एकानं सांगितलं. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संघानं राज्यातील २८८ मतदारसंघांत सर्व्हे केला होता.

महायुती विधानसभेला १६० जागा जिंकेल असं संघाचा सर्व्हे सांगतो. यातील ९० ते ९५ जागा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं राज्यात १०० जागांचा टप्पा ओलांडला आहे. पण यंदा भाजप १०० जागांच्या आत असेल, असा कयास आहे. त्यामुळे भाजपची हॅट्ट्रिक हुकेल अशी दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४० ते ५० जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या कामगिरीवर असंतुष्ट होऊन इंडिया आघाडीला मतदान केलेले मतदार या सर्व्हेच्या केंद्रस्थानी होते.