मनसेचे ५८ उमेदवार जाहीर

ठाणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील ५८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १४ उमेदवारांचा यात समावेश आहे. यातील ठाणे, कल्याण ग्रामीण आणि कळवा-मुंब्रा आणि ओवळा-माजिवडे या मतदारसंघातील मनसे उमेदवारांची लढत जोरदार होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेकवेळा भेटीगाठी आणि चर्चा झाल्याने सुरुवातीला मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र श्री.ठाकरे यांनी ५८ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने मनसेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

या यादीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १४ मतदारसंघांचा समावेश आहे. ठाणे शहर मतदारसंघातून जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये त्यांनी भाजपा उमेदवाराशी चांगली लढत दिली होती. विविध आंदोलनातून ते पुढे आले आहेत. कल्याण ग्रामीण मतदार संघातून विद्यमान आमदार राजू पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ओवळे-माजिवडे मतदारसंघातून मनसेचे त्या क्षेत्राचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचंगे यांनी ठाणेकरांना विविध सोयी-सुविधा मिळवून देण्यात यशस्वीपणे लढा दिला आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून सुशांत सूर्यराव या तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे. शाखाप्रमुख ते उप शहर प्रमुख अशी त्यांची कारकीर्द असून त्या आधी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेतही काम केले आहे. स्थानिकांचे प्रश्न विविध आंदोलनातून त्यांनी मार्गी लावले असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे ते प्रतिस्पर्ध्याला घाम फोडू शकतात, अशी चर्चा आहे.

ऐरोलीमधून मनसेने निलेश बाणखेले यांना उमेदवारी दिली आहे. बेलापूरमधून गजानन काळे, नालासोपारामधून विनोद मोरे, भिवंडी पश्चिममधून मनोज गुळवी, मीरा भाईंदरमधून संदीप राणे, शहापूरमधून हरिश्चंद्र खांडवी आणि मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विक्रमगडमधून सचिन शिंगडा, भिवंडी ग्रामीणमधून वनिता कथुरे, पालघरमधून नरेश कोरडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.