शिवसेना-ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणात

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केदार दिघे यांना कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उद्धव ठाकरे गटाने आज ठाणे, कोपरी-पाचपाखाडीसह राज्यातील ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार याकडे ठाणेकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आज अखेर ठाकरे गटाने कै. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात, माजी खा. राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. ओवळा-माजिवडा मतदार संघातून ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा सामना आ. प्रताप सरनाईक यांच्याबरोबर होणार आहे. भिवंडी ग्रामिण मतदार संघातून महादेव घाटळ यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना आमदार शांताराम मोरे यांच्याशी होणार आहे. अंबरनाथ मतदारसंघात राजेश वानखेडे या तगड्या उमेदवाराला आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या विरोधात ठाकरे गटाने उतरवले आहे. डोंबिवली मतदारसंघातून दीपेश म्हात्रे हे निवडणूक लढविणार असून त्यांचा सामना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी होणार आहे. कल्याण ग्रामिण मतदारसंघात मागील वेळी तिकीट कापलेले माजी आमदार सुभाष भोईर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांचा सामना मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याशी होणार आहे. ऐरोली मतदार संघातून भाजपाचे गणेश नाईक यांच्या विरोधात महाविकास आघाडीने एम.के. मढवी या तुल्यबळ उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

शिवसेना शिंदे गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून आ. प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते आमदार संजय केळकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून या भागातील मतदार देखील त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गर्दी करत आहेत.