शिंदे गटातील बंडखोरी भाजपचे गणित बिघडवणार?

ठाणे : कोणत्याही परिस्थितीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्याच्या इराद्याने भाजपा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असली तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे भाजपाच्या जागा कमी होणार की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण पूर्व, मुरबाड आणि ऐरोली मतदार संघात महायुतीला बंडाखोरीचे ग्रहण लागले आहे. शिंदे गटाच्या इच्छुकांनी भाजपा उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे शहर मतदार संघातून तिसऱ्यांदा भाजपचे संजय केळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदार संघातून शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर हे इच्छुक होते, परंतु युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपाच्या वाट्याला आल्याने श्री. भोईर हे नाराज झाले आहेत. त्यांनी या मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे तर माजी महापौर सौ. शिंदे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. महिला म्हणून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे.

मुरबाड मतदारसंघातील उमेदवारी भाजपाने किसन कथोरे यांना दिल्याने बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत. आ. गायकवाड यांनी गोळीबार केलेले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटासोबत असणारे राजन किणे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते तर ऐरोली मतदार संघात भाजपाने गणेश नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याने नाराज झालेले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे, त्यामुळे महायुतीमधील नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समोर आहे.

४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्यावेळी बंडखोरांचे बंड शांत करण्यात महायुतीच्या नेत्यांना किती यश येते यावर महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या जागा कमी झाल्यास सत्ता कारणात भाजपचे वजन कमी होणार आहे. किंबहुना भाजपकडून देखील मित्र पक्षांच्या मतदारसंघात अशी बंडखोरी झाल्यास या सर्व बंडखोरीचा सर्वाधिक फायदा महाआघाडीला होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.