अविनाश जाधव रिंगणात; नागरी समस्यांसाठी आयुक्तांची भेट!

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून उच्चभ्रू सोसायटी समजल्या जाणाऱ्या हिरानंदानीसह घोडबंदर पट्ट्यातील अनेक सोसायट्यांमधील कचरा उचलला जात नसल्याने आवारात कचर्‍याचे ढिग जमा झाले आहेत. यात भर म्हणून त्यांना पाण्याचा तुटवडाही सहन करावा लागत आहे. दिवाळी सण जवळ असताना येथील रहिवाशांवर आजाराचे सावट वाढले आहे. या समस्या घेऊन सोमवारी या भागातील रहिवाशांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट पालिका मुख्यालय गाठत आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे.

ठाण्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजाराने डोके वर काढले. या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेची गरज असताना डंपिंगचे घोडे अडल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचू लागले आहेत. घोडबंदर मार्गही याला अपवाद राहिलेला नाही. येथील ब्रम्हांड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत भागात दररोज कचरा उचलण्यासाठी येणार्‍या घंटागाड्यांच्या फेर्‍या कमी झाल्या आहेत. परिणामी कचरा परिसरात साचत आहे. कचर्‍याची ही समस्या असताना परिसरात झाडांमुळे निर्माण होणारा पालापाचोळयाचेही ढिग लागत आहेत. हा कचरा उचलण्यास घंटागाडीवाले नकार देत आहेत. सध्या रोज सायंकाळी पावसाची हजेरी लागत असल्यामुळे परिसरातील कचरा कुजून त्याची दुर्गंधी वाढली आहे.

कचर्‍याची समस्या असतानाच या परिसरात पुन्हा पाणीटंचाईनेही डोके वर काढले आहे. घोडबंदर भागात पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने साठवणुकीचे पाणी रहिवाशांना वापरावे लागते. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही टँकरचा फेरा सुटत नसल्याने रहिवाशी हैराण झाले आहेत. या दोन प्रमुख समस्या घेत येथील रहिवाशांनी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. परिसरातील समस्यांचा पाढा यावेळी वाचण्यात आला.

यावेळी शहरातील कचराकोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच घोडबंदर परिसरातील कचरा उचलण्यासोबत झाडांचा पालापाचोळ्याची समस्याही दूर करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले आहे.

डायघर येथील प्रकल्पामध्ये झालेला बिघाड दुरुस्त झाला आहे. त्यामुळे साचलेला कचरा उचलण्यासाठी जादा डंपरची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीपूर्वी हा कचरा उचलून शहर चकाचक करण्याचे आश्वासन यावेळी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे.

ठाणे महापलिकेला मुंबई महापालिकेने १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला आहे. त्यापैकी ७५ दशलक्ष लीटर पाणी घोडबंदरच्या नागरी वसाहतींकडे वळवला जाणार आहे. पण याबाबतची निर्णयप्रकीया आचारसंहितेनंतर पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतनंतरच पाणी प्रश्न सुटेल असे संकेत आयुक्तांनी रहिवाशांना दिले आहे. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, घोडबंदर हिरानंदानी या भागातील नागरिक आणि मनसेचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.