तिसरी आघाडी १५० जागा लढणार

* शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार
* शरद पवारांवरही हल्लाबोल

पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत 150 जागांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील आमचे बोलणे सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.

सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणाले. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकार युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थाने कामाचे असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडू म्हणाले.

स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आमच्याकडे छोट्या-मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.