कळवा-मुंब्रा मतदारसंघात बॅनरवॉर

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लागले निनावी बॅनर

ठाणे : राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर बॅनरवॉर सुरु झाले आहे. राष्ट्रावादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कळवा परिसरात निनावी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरच्या माध्यमातून पंधरा वर्षांतील कामाचा हिशोब मागण्यात आला आहे. मतदार संघात आव्हाडांच्या विरोधात लागलेल्या बॅनर्समुळे जितेंद्र आव्हाडांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर फाडले.

महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर अनेक मतदार संघातील राजकीय वातारण तापू लागले आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघही याला अपवाद नाही. एकेकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले आणि आता राष्ट्रावादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत गेलेले ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे आव्हाड यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघात गुरु विरोधात शिष्य असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुल्ला यांनी आव्हाड यांना चितपट करण्याची एकही संधी सोडली नसल्याने हे बॅनर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीच लावले असावे, असा आरोप आव्हाड समर्थांकडून करण्यात येत आहे.

मागील १५ वर्षात आपण काय केले हे जनतेला सांगण्यासाठी आव्हाड यांनी कळवा-मुंब्य्रात १५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची, सफर अभी बाकी है…, १५ वर्षे प्रगतीची, सुख सुविधांची अन, सृजनशीलतेची, १५ वर्षे जिद्दीची, सातत्याची आणि प्रयत्नांची, अशा आशयाचे बॅनर लावले होते. या बॅनरच्या शेजारीच “हिशोब मागतोय कळवा-मुंब्रा, १५ वर्षांच्या विकासाचा?” अशा मथळ्याखाली निनावी बॅनर बुधवारी रात्री उशिरा झळकवण्यात आले. मतदारसंघात लावण्यात आलेल्या या बॅनरवर कोणाचेही नाव नसले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच हे पोस्टर्स लावण्यात आल्याची चर्चा सध्या कळवा मुंब्रा मतदारसंघात रंगताना दिसत आहे.

बुधवारी नजीब मुल्ला यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन कळवा मुंब्र्यासाठी आतापर्यंत महायुतीच्या माध्यमातून १५० कोटींचा निधी दिला असल्याची माहिती दिली. त्यानंतरच १५ वर्षात कळवा मुंब्र्यासाठी काय केले अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय वातारण चांगलेच तापले आहे.