यंदा बेलापूरचा किल्लेदार कोण?

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्रात विजय नाहटा यांनी महायुतीतून आपला दावा जरी सोडला असला तरी माजी आमदार संदीप नाईक हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या ठिकाणी मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा बेलापूरचा किल्लेदार कोण होणार? याकडे नवी मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.

२००४मध्ये उत्तनपासून, देसाई गाव ते बेलापूरपर्यंत विधानसभा क्षेत्र होते. २००९ मध्ये नवीन विधानसभा रचनेत नवी मुंबई शहरात ऐरोली आणि बेलापुर असे दोन विधानसभा क्षेत्र तयार झाले. नवीन बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे गणेश नाईक हे पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी भाजपचे सुरेश हावरे यांचा पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये गणेश नाईक मंत्री असताना राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा अवघ्या १४०० मतांनी पराभव करत त्या जायंट किलर ठरल्या होत्या. २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते ऐरोलीमधून तर मंदा म्हात्रे बेलापूरमधून दुसऱ्यांदा आमदार झाल्या. आता मात्र बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे यांना भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनीच आव्हान दिले असून त्यांनी बेलापूरवर दावा ठोकल्याने बेलापुर मतदारसंघात नवीन पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देतात का? युवा चेहरा म्हणून संदीप नाईक यांना पसंती देतात. त्यामुळे भाजपतर्फे बेलापूरचा किल्ला कोण लढवणार आणि कोण किल्लेदार होणार? याकडे नवी मुंबई करांच्या नजरा लागल्या आहेत.