ठाण्यातील चारही मतदारसंघांतून मनसे देणार उमेदवार

एकनाथ शिंदेंविरोधात अभिजित पानसे?

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने स्वबळावर उतरण्याचा निर्धार केला आहे. ठाणे शहरातील चारही मतदारसंघांमध्ये मनसे निवडणूक लढणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही राज ठाकरे उमेदवार देणार आहेत.

शिवसेना, भाजप यांच्या विद्यमान आमदारांच्या विरोधातही मनसे उमेदवार उभे करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच एल्गार केला होता, त्यानंतर ठाणे शहरातील चारही मतदारसंघांत उमेदवार उतरवण्याच्या मनसेच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. मनसेच्या निर्धारामुळे ठाण्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे अशा तिरंगी लढती पाहायला मिळतील.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात तीन टर्म आमदार राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे हुकमाचा एक्का उतरवण्याची शक्यता आहे. मनसे नेते अभिजीत पानसे कोपरीतून रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. पानसेंना नुकत्याच झालेल्या विधान परिषदेवरील ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेने रिंगणात उतरवलं होतं. मात्र भाजपच्या निरंजन डावखरेंची वाट अडचणीत आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरुन त्यांनी माघार घेतली होती. इतकंच नाही, तर याची परतफेड करण्याचं वचनही फडणवीसांनी दिल्याची चर्चा होती. मात्र आता कोपरीतून शिंदेंविरोधात पानसे रिंगणात उतरले, तर फडणवीस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

याशिवाय दोन टर्म आमदार असलेले भाजपचे संजय केळकर यांच्याविरोधात अविनाश जाधव निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. तर कळवा मुंब्रा येथून शरद पवार गटातील चार टर्म आमदार असलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सुशांत सूर्यराव मनसेकडून आव्हान देण्याची चिन्हं आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघात तीन टर्म आमदार असलेले शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना मनसेचे संदीप पाचंगे किंवा अन्य लढत देण्याची शक्यता आहे.