नोकरीसाठी तरुणाला मालदीवमध्ये ठेवले डांबून

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या पारीख कुटुंबियांचा मुलगा काही महिन्यांपूर्वी मालदीव येथे शेफच्या कामासाठी गेला होता. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या मुलाला तिकडे त्रास देण्यास सुरुवात झाली. आपल्या मुलाला मालदीवहून भारतात परत येण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे यासाठी गायत्री पारेख यांनी प्रसिद्धी माध्यमातून मागणी केली आहे.

हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन अधिक वेतनाच्या आशेने मालदीव येथे खाजगी एजन्सीद्वारे गेलेल्या पारेख कुटुंबातील मुलास शेफच्या कामाऐवजी मोलमजुरी करावयास लागत असल्याने तो घरी परत येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला घरी पाठविण्याऐवजी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याने भारतात परत येण्याचा प्रयत्न केला असता त्यास विरोध करण्यात आला असून इकडे येण्यापासून रोखले जात आहे. त्याच्यासोबत १० ते १५ जण अडकले असून त्या सर्वांनी पारीख यांच्या आईकडे विनंती केली आहे.

त्यानंतर गायत्री पारीख यांनी मंत्रालय, राजकारणी, स्थानिक पोलीस यासह सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला असून अनेक चकरा मारल्या. मात्र त्यांना यश मिळाले नाही. अनेक प्रयत्न करून देखील हाती अपयश आल्यावर त्यांनी अखेर प्रसिद्धी माध्यमांकडे मदत मागितली व त्यांच्या मुलाला मुंबईत आणण्यासाठी मदत मिळावी या करीता भारतीय प्रशासनाने मदत करावी अशी विनंती केली आहे.

परदेशातील भारतीय राजदूत कार्यालयामार्फत मालदीवमध्ये अडकलेल्या पारेख कुटुंबातील मुलासह इतरांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्याची विनंती गायत्री पारेख यांनी केली आहे.