महायुतीने रिपोर्ट मांडला; विरोधकांवर निशाणा साधला

मुंबई : निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून आज महायुतीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महायुतीच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले. रिपोर्ट कार्ड सादर करतांना महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला.

महायुती सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये “लाडकी बहीण योजना, टोलमाफी, महिला, युवक, कामगार यांच्यासाठी आणलेल्या कल्याणकारी योजना राबवून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी काय केले, याची माहिती आहे. मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये सरकारने कुठे गुंतवणूक केली याचीही माहिती या रिपोर्ट कार्डमध्ये आहे.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी हिंमत लागते, काम करावे लागते. आम्ही एवढी कामे केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. पायाभूत सुविधांमध्ये आज महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टर रोड यासारखे प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण केले. महायुती सरकारचे काम वाखाणण्याजोगे आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्थगिती सरकार गेल्यानंतर प्रगतीचे सरकार राज्यात आले. सरकारच्या गतीमुळे राज्याची प्रगती लक्षात आली. परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मविआने एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकिय मान्यता दिली नसल्याने सिंचनाचे काम ठप्प होते. त्यामुळे १४५ प्रकल्पांना आता मान्यता मिळाली असून, महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भागात या प्रकल्पांच्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले.

अजित पवार म्हणाले की, “जनतेच्या जीवन बदलणाऱ्या योजना आम्ही दिल्या आहेत. आमच्या योजनांचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे ते गडबडून गेले आहेत. ज्यावेळी आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणार नाही, फॉर्म भरले जातील पैसे मिळणार नाहीत अशी टीका विरोधकांनी केली. मात्र अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून पैसे जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.