टोविंग व्हॅन कर्मचारी वाहनधारकावर गेला धावून

भिवंडी : भिंवडीतील असाच एक टोविंग कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला असून तो अक्षरश: वाहनधारक नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून येते. यावेळी, स्थानिकांनी मध्यस्थी करुन हा वाद सोडवला. मात्र, या कर्मचाऱ्याचा मुजोरीपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भिवंडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची झाली आहे. त्यातच रस्त्यालगत होणारी पार्किंग ही सुध्दा वाहतूक कोंडीसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोविंग व्हॅन शहरात फिरविण्यात येत असते. मात्र, बऱ्याच वेळा या टोविंग व्हॅन एकच रस्त्यावर घिरट्या घालताना दिसून येतात. तर या व्हॅनवरील पोलिस कारवाई करताना कोणत्याही सूचना न देता सर्रासपणे वाहन उचलत असल्याने अनेकवेळा हे वादाचे कारण ठरत आहेत.आता देखील टोविंग वाहनाच्या कर्मचाऱ्याने अरेरावी करत वाहनधारकास मारहाण करण्यासाठी हात उगारल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे, या कर्चमाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली जात आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या गेटसमोरील कोटर गेट रस्त्यावर बुधवारी दुपारी कोणतेही सायरन न वाजवता वाहतूक पोलिसांची टोविंग व्हॅन आली होती. कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा कुठलेही सायरन न वाजवता येथील कर्मचारी रस्त्याच्या दुतर्फा, महापालिकेच्या बाहेर आडोशाला लावलेल्या दुचाकी उचलत असल्याचे निदर्शनास आल्याने एका वाहनधारकाने त्यास विरोध केला. त्यावेळी, या कर्मचाऱ्यांचा दुचाकी चालकासोबत वाद होवून त्यांच्यात हाणामारीची घटना घडली. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांसमोर होत असताना ते शांतपणे हा सर्व प्रकार पहात बसले होते. त्यामुळे, उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून नागरिकांना वाहतूक पोलिस व टोविंग वाहनाच्या कर्मचाऱ्यांबद्दल संतप्त शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.