ठाणे : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद कालवार शाळेने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गटातून मुंबई विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे. मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व ११ लाख रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ठाणे चे प्राचार्य डॉ. संजय वाघ, आशिष झुंजारराव, मधुकर घोरड व इतर अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच ग्रामस्थ कालवार यांनी गावात मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. शाळेस हे यश मिळाल्याने सरपंच ॲड. महेश म्हात्रे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह शाळेत येऊन सर्व शिक्षकांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. शाळेस यापुढेही भौतिक व गुणवत्ता विकासासठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद शाळा कालवार ही भिवंडी तालुक्यातील राहनाळ केंद्रातील ग्रामीण भागातील शाळा आहे. शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून २३५ विद्यार्थी आहेत. सुसज्ज इमारत, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग, इ लायब्ररी, एनएसक्यूएफच्या धर्तीवरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शाळेस विविध सुविधा प्राप्त करून घेणे, तसेच विद्यार्थी गुणवत्ता आदीच्या आधारे शाळा गुणांकनात अव्वल ठरल्याचे केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी सांगितले.
शाळेने या अभियानात सहभाग घेतल्यावर ग्रामपंचायत कालवार व शाळा व्यवस्थापन समिती कालवार यांनी शाळेस विविध उपक्रमांसाठी सहकार्य केले. तसेच गटशिक्षणाधिकारी संजय आसवले, विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे, केंद्रप्रमुख शरद जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक अजय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
शाळेतील सर्व शिक्षक हे एक युनिट म्हणून काम करतात. प्रत्येकाला दिलेले काम कोणतीही तक्रार न करता केले जाते. आमच्या शाळेत प्रत्येकाच्या मताला किंमत दिली जाते त्यामुळे सुंदर शाळा करताना आम्हाला वेगवेगळ्या नवीन कल्पना साकारता आल्या. शाळा सुशोभीकरण, सुविचार लेखन, जागतिक प्रमाण वेळ दर्शवणारी नकाशातील घड्याळे इत्यादी शिक्षकांच्या कल्पना साकारल्या. त्यामुळे आम्हाला हे यश गाठता आले, असे शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनिला काबाडी यांनी सांगितले.