पहिल्या रेल्वे इंजिन मोनोमेंट परिसराला झळाळी

आमदार संजय केळकर यांच्या विकास निधीतून सुशोभीकरण

ठाणे : शहराच्या विकासाबरोबरच शहराच्या ऐतिहासिक खुणा आणि वारसा जपणाऱ्या आमदार संजय केळकर यांनी बोरीबंदर-ठाणे या मार्गावर प्रथम धावलेल्या रेल्वे इंजिनला ठाणे रेल्वे स्थानकात मानाचे स्थान मिळवून दिलेच, शिवाय हे इंजिन ठेवलेल्या फलाट क्र.१ येथील परिसराचे विकास निधीतून सुशोभीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांचे हे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

१६ एप्रिल १८५३ या दिवशी भारतात बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली आगगाडी धावली. त्या आगगाडीचे इंजिन मोनोमेंट म्हणून ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एकजवळ उभारण्यात आले आहे. या परिसराचे सुशोभीकरण आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते. त्याचे लोकार्पण व नामफलकाचे अनावरण नुकतेच श्री. केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाणे येथील मोनामेंट म्हणून प्रदर्शनास ठेवण्यात आलेले रेल्वे इंजिनला ऐतिहासिक महत्त्व असून ठाणेकरांच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे असल्याचे आ. केळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. हा परिसर अधिक सुशोभित आणि सुंदर करण्यासाठी भविष्यातही आपण सहकार्य करू, अशी ग्वाही श्री. केळकर यांनी दिली. हे इंजिन ठाणे येथे मोनामेन्ट म्हणून स्थापित करावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी २०१८ पासून रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, वैष्णवी तसेच पियुष गोयल आदींकडे पत्रव्यवहार करून ही मागणी सातत्याने लावून धरली होती. अखेर पियुष गोयल यांनी योग्य प्रतिसाद देऊन ही मागणी मान्य करून श्री.केळकर यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणून दिले. कृतज्ञता म्हणून श्री. केळकर यांनी पियूष गोयल यांचे आपल्या भाषणात विशेष अभिनंदन केले. मोनामेंट म्हणून उभारण्यात आलेले रेल्वे इंजिन ठाण्याच्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग असून त्याचे संवर्धन व जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी त्याची सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भविष्यातही यासाठी लागणारा अधिकाधिक निधी आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आमदार केळकर यांनी आपल्या भाषणात दिली.

यावेळी ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, शिवशंकर मिश्रा तसेच ठाणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर केशव तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, लोहमार्ग पोलीस तसेच श्री,कोष्टी पोलीस निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल व इतर रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात अनेक नागरिक उपस्थित होते. विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आलेले इंजिन व परिसर यामुळे अनेक नागरिक समाधान व्यक्त करीत होते.