एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी हंगामाला सुरुवात
नवी मुंबई: पावसाळा संपताच थंडीची चाहूल लागली की बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे वाशीतील एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे.
बुधवारी महाबळेश्वर आणि नाशिक येथील २०० बॉक्स स्ट्रॉबेरी दाखल झाली असून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे दर नाशिक स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक आहेत.
वाशीच्या मुंबई कृषीउत्त्पन्न फळ बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरु झाली आहे. एपीएमसी बाजारात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरी हंगामाला सुरुवात होते. याआधी स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वर, पाचगणी येथूनच दाखल होत होती. मात्र दिवसेंदिवस बाराही महिने स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकरी दरवर्षी उत्पादन वाढवत आहेत. मागील एक ते दोन वर्षांपासून एपीएमसी बाजारात नाशिक येथील स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.
महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी ही चवीला अधिक गोड असल्याने नाशिकपेक्षा याला जास्त पसंती देण्यात येत आहे. सध्या बाजारात २००बॉक्स दाखल होत असून नाशिकपेक्षा महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीला अधिक दर आहेत. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी प्रतिकिलो ८०० रुपये तर नाशिक येथील ६०० रुपये दराने विक्री होत आहे, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे.