अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे झाला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ हे मान्यवर दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार डॉ.बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, हरिश्चंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, डॉ.अर्चना पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे, मनोज सयाजीराव तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

सर्वांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे), या 10 ठिकाणच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन सुरू केले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसह या वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा देखील पुरविली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसह नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स (IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले की, अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरु होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला मंजुरी मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील दहा नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ सोहळा पार पडला. याअंतर्गत अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.