मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पुढाकार
डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने, कृषी विभाग आत्मा व कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान व विंग्रो मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या ग्राहक पेठेचे उद्घाटन करण्यात आले.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानात या वेळेत ही ग्राहक पेठ सुरु राहणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या महापालिका मैदानांवर आयोजित केली जाणार आहे.
याबद्दल अधिक माहिती सांगताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, “शेतकऱ्यांसाठी ग्राहक पेठ आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेऊन त्यासाठी डोंबिवली महापालिकेचे सर्व मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी महापालिका आयुक्तांशी मागील काही दिवसांपासून चर्चा करत होतो. या चर्चेमध्ये आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतल्यामुळे डोंबिवली येथील डोंबिवली येथील नेहरू मैदानात आम्ही ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ पेठ सुरु करत आहोत. या ग्राहक पेठेच्या माध्यमातून शेतात पिकवलेला शेतमाल व भाजीपाला ग्राहकांना चांगल्या पद्धतीने व स्वस्त दरामध्ये ग्राहकांना मिळतो आणि कोणत्याही दलालाची मध्यस्थी नसल्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा या व्यवहारातून जास्तीत जास्त फायदा होतो. देशातील बळीराजा शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे आणि ग्राहक व शेतकरी यांच्यामध्ये जे दलाल आहेत ते कायमचे निघून गेले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचलले आहे.”