‘ब’ गटातील ‘फेव्हरेट्स’ बांगलादेशवर त्यांचे वर्चस्व कायम ठेवणार?

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीतील सहावा सामना शनिवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर २००९चे विजेते इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल. एकीकडे बांगलादेशने स्कॉटलंडला पराभूत करून त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे इंग्लंड या आवृत्तीतील त्यांचा पहिला सामना खेळणार आहेत. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड यांच्यासोबत इंग्लंड आणि बांगलादेश ब गटात आहेत.

 

आमने-सामने

इंग्लंड आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध तीन आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत आणि त्या सर्व सान्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली आहे. ते तिन्ही सामने आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचा भाग म्हणून खेळले गेले होते.

 

 संघ

इंग्लंड: हेदर नाइट (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, सोफिया डंकले, नॅटली सिव्हर-ब्रंट, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, सोफी एकलस्टन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माइया बुशेर, लिनसे स्मिथ, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, बेस हीथ

बांगलादेश: निगर सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अक्तर, मुर्शिदा खातून, शोर्ना अक्तर, रितू मोनी, शोभना मोस्तरी, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अक्तर, जहानारा आलम, दिलारा अक्तर, ताज नेहार, शठी राणी, दिशा बिस्वास

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नॅटली सिव्हर-ब्रंट: इंग्लंडची ही धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू तिच्या संघासाठी एकहाती सामने जिंकू शकते. ती मधल्या फळीतील एक भक्कम फलंदाज आहे आणि उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आहे. १२२ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये तिने २५१३ धावा केल्या आहेत आणि ८६ विकेट्स घेतल्या आहेत.

सोफी एकलस्टन: इंग्लंडची ही डावखुरी फिरकीपटू सध्याच्या आयसीसी रँकिंग्सनुसार जगातील अव्वल क्रमांकाची टी-२० गोलंदाज आहे. या कॅलेंडर वर्षात, तिने १० आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १७ विकेट्स पटकावल्या आहेत. विकेट्स घेण्याबरोबरच तिचे गोलंदाजीची आकडे किफायतशीर आहेत.

रितू मोनी: ती बांगलादेशच्या सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्धच्या मागील सामन्यात या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने चार षटकात १५ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. गोलंदाजीबरोबरच ती एक उत्कृष्ट मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सुद्धा योगदान करते.

शोभना मोस्तरी: बांगलादेशची ही उजव्या हाताची टॉप ऑर्डर फलंदाज स्कॉटलंडविरुद्धच्या मागील सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या ज्यात दोन चौकारांचा समावेश होता.

 

हवामान

जवळपास ३० अंश सेल्सिअस तापमानासह दुपारच्या तुलनेत संध्याकाळचा हवामान थंड राहण्याची अपेक्षा आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ५ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार