उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसचा ‘मास्टरप्लॅन’

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्याच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्वोत्तम उमेदवार रिंगणात उतरवेल. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही, या निवडणुकीसाठी उमेदवार कसा निवडला जावा, यासाठी खास मास्टरप्लॅन तयार केला आहे.

विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या १ ऑक्टोबर घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला भरपूर प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.