ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला राज्याकडून १२,५०० कोटी

रखडलेल्या प्रकल्पाला मिळणार गती

ठाणे: केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आज राज्य सरकारने ठाण्याच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या कामाकरिता 12,500 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच टिकूजींनी वाडी ते बोरिवली बोगदा आणि केमिकल रिसर्च केंद्राला भूखंड देण्यास कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वडाळा ते कासारवडवली या मुख्य मेट्रो प्रकल्पासह ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला देखील खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक शेवटची असल्याने या बैठकीत ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मागील अनेक वर्षे रखडलेल्या अंतर्गत मेट्रोचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.

ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली आहे. आता ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रोला केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या 12 हजार कोटींच्या निधीमुळे खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त डॉ. संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली होती. महामेट्रो कंपनीकडून या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. मात्र वर्तुळाकार मेट्रो हा अधिक खर्चिक असल्याचे सांगत केंद्राने अंतर्गत मेट्रो ऐवजी एलआरटी प्रकल्प राबवण्याच्या सूचना ठाणे महापालिकेला केल्या होत्या. वर्तुळाकार मेट्रो हा प्रकल्प १३ हजार कोटींचा होता तर एलआरटी प्रकल्पाची किंमत ही ७१६५ कोटींच्या घरात होती. त्यामुळे एलआरटीमुळे सुमारे पाच हजार कोटींची बचत होणार होती. तसा प्रस्तावही पालिकेने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता एलआरटी प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत केंद्राने नोंदवल्याने केंद्राच्या सूचनेनंतर पुन्हा वर्तुळाकार मेट्रोचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.

एकूण २९ किमी लांबीचा हा मार्ग असून तीन किमी पर्यंतचा मार्ग हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर १३ रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवीन विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक येथून या वर्तुळाकार मेट्रोची सुरुवात होणार आहे. वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी आणि ठाणे स्टेशन असा मेट्रोचा मार्ग होता. त्यावेळी दोन स्थानके भुयारी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र वर्तुळाकार मेट्रोचे काम आता महामेट्रोच्या ऐवजी एमएमआरडीए करणार आहे.

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी असे मुख्यमंत्र्यांचे नियोजन आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे या प्रकल्पालाही गती मिळेल, अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोच्या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार आहे.

असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प
एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून तीन किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांतर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

दरम्यान टिकूजीनी वाडी ते बोरिवली या बोगद्यामुळे अवघ्या २० मिनिटांत प्रवास पूर्ण होणार असून या प्रकल्पाच्या कामासाठी १५ हजार कोटी कर्ज घेण्यासाठी देखिल मंजुरी देण्यात आली. शिळफाटा येथे केमिकल रिसर्च सेंटर उभारण्यासाठी लागणारा भूखंड देण्यास देखिल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

वर्तुळाकार मेट्रोची प्रस्तावित स्थानके
वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर
कोलशेत, बाळकूम, राबोडी, ठाणे स्टेशन