ठाण्याच्या १७ महिलांनी केला गिनीज बुक रेकॉर्ड !

५८,११२ क्रोशाच्या विणकामाचे चौकोन

ठाणे : ठाण्यात राहणाऱ्या, मधु लाला या कलाकार महिलेने आपल्या समवेत आणखी १५ महिलांना घेऊन अंजली कुलकर्णी आणि माधवी यांच्या मार्गदर्शनाखाली ५८,११२ क्रोशाच्या विणकामाचे चौकोन बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान पटकावले.

महिला मनोविकास ही एक क्रोशा विणकाम कलाकारीला वाहून घेतलेली संस्था असून दरवर्षी असे उपक्रम या संस्थेमार्फत घेतले जातात. यावर्षीही हा उपक्रम राबविला गेला होता. त्यात अखिल भारतातून अनेक उत्साही, विविध वयोगटातील क्रोशाकलाकार स्त्रियांनी भाग घेतला होता. त्यांच्या सहभागातून ५८,११२ क्रोशाच्या विणकामाचे भव्य प्रदर्शन, विशाखापट्टणम येथे २२ सप्टेंबर २०२४ रोजी भरविण्यात आले होते. त्यात या सहभागी महिलांचे अनोखे कौशल्य, नवनिर्मिती आणि दिव्य समर्पण खरोखरच वाखाणण्याजोगे होते. या महिलांमध्ये अंजली कुलकर्णी, मधु लल्ला, शैलजा आपटे, सुनंदा कुलकर्णी जयश्री लोहरेकर, मंजिरी पानसे, वृंदा देशमुख, भैरवी सोनार, पल्लवी फणसे, पौर्णिमा इनामदार, मानसी कदम, प्राची किर्तीकर, सुलेखा काणेगावकर, श्रुती काळे, संगिता बांगर, संगिता मोकाशी, मेघना आंबेगावकर, अवनी देवरुखकर, मेधा जोशी या १७ महिला कलाकारांचा समावेश होता.

या सर्व सहभागी स्त्रियांच्या कौशल्याचे कौतुक करून, पदक, ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदणी केली. या रेकॉर्ड ब्रेक चौकोनांच्या शाली बनवून गरजू विद्यार्थी आणि संस्थांना देण्यात येणार आहेत. या अनोख्या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.