भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली भिवंडीकरांचा वावर

२४ दिवसांत १५४७ नागरिक जखमी

भिवंडी : शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यातील अवघ्या दोन दिवसांत १२५ हून अधिक जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झाले, तर सप्टेंबरच्या २४ दिवसांत १५७८ जण जखमी झाले.

पि‌साळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय लैबा शेख हिचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने शांतीनगर परिसरातून कुत्रे पकडण्याचे काम सुरू केले. केवळ दोन कुत्रे पकडल्यानंतर काम थांबवण्यात आले. दरम्यान निविदेला मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कुत्रे पकडण्याचे व निर्बिजीकरणाचे काम अद्याप सुरू केलेले नाही. या दिरंगाईमुळे आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांची चिंता वाढली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. सध्या भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, ते शहरातील प्रत्येक भागात फिरताना दिसत आहेत.

भटकी कुत्रे गटागटाने फिरत असून ते नागरिकांचा पाठलागच करत नाहीत तर ते त्यांच्या जीवावर उठतात. अनेकवेळा पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेकांचे अपघात झाले आहेत. अनेकदा वाहनचालक देखील गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील विविध भागात विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शांतीनगरमधील मुलीच्या मृत्यूनंतर शहरात मनपा आरोग्य विभागाविरोधात संताप तर वाढलाच, पण कुत्र्यांवर अंकुश ठेवण्याची मागणीही जोर धरू लागली.

आमदार महेश चौघुले यांनी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्याकडे भटक्या कुत्र्यांची दहशत संपवण्यासाठी त्यांना पकडण्याची मागणीही केली होती. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेशी संपर्क साधून भटके कुत्रे पकडण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर उल्हासनगर मनपाच्या सहकार्याने शांतीनगर परिसरातून केवळ दोन कुत्रे पकडून भिवंडी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने कारवाई थांबवली. त्यामुळे शहरात रस्त्यावरील कुत्रे चावण्याच्या घटना वाढल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दररोज कुत्र्याच्या चावण्याने नऊ लोक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. जखमी नागरिक इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्येही त्यांची संख्या जास्त आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ३० लाख रुपयांचे टेंडर बंगळुरूच्या डॉ. मुरली हैदराबाद यांना देण्यात आले असून, त्यांनी शहरातील कुत्रे पकडण्यासाठी ५० पिंजऱ्यांचीही ऑर्डर दिली आहे. लवकरच त्यांना पकडून निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी जे.एम.सोनवणे यांनी दिली.

शहरात भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना सुरूच आहेत. दररोज कुत्र्यांनी चावा घेतलेले सुमारे ९ ते १० नागरिक रुग्णालयात येत असल्याचे आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाॅ.माधवी पांढरे यांनी सांगितले.