शिक्षक समर्थ असला तर देशाचे फाउंडेशन भक्कम राहील

मिलिंद बल्लाळ यांचे प्रतिपादन

ठाणे : ‘शिक्षक समर्थ असला तर देशाचे फाउंडेशन भक्कम राहील. शिक्षकांसमोर तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शिक्षकांनी अपडेट रहायला पाहिजे. विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वीच तो त्या विषयाची माहिती यु-ट्युब, गुगल, विकिपीडियावरून बघून आलेला असतो. त्यामुळे शिक्षकाला खूप जागरूकपणे वर्गात शिकवावे लागते, असे मिलिंद बल्लाळ यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले.

राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा सप्टेंबर २०२४ आणि १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. ‘समर्थ फाऊंडेशन’ आणि ‘एज्यूरिक हब-ठाणे’यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय शिक्षक गौरव” पुरस्कार प्रदान सोहळा रविवार २२ सप्टेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात पार पडला.
सोहळयाचे प्रमुख पाहुणे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे होते तर सन्माननीय पाहुणे म्हणून ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ होते. विशेष अतिथी राजेश जाधव उपस्थित होते.

‘समर्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक साबळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि निवेदन अ‍ॅड. सुनिता साबळे यांनी केले. श्री. डावखरे यांनी आपल्या भाषणातून, शिक्षकांनी टेक्नोसावी होणे कसे गरजेचे आहे, हे त्यांनी माकड व टोपीवाला या कथेच्या आधाराने अतिशय मार्मिकपणे शिक्षकांसमोर मांडले.
पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून निवडलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला तसेच १० च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.सुनिता साबळे यांनी सर्वांचे आभार मानले.